तासगावात आजपासून मुलाखती
By admin | Published: October 22, 2016 12:03 AM2016-10-22T00:03:34+5:302016-10-22T00:03:34+5:30
भाजपची सुरुवात : राष्ट्रवादी, काँग्रेसचीही तयारी; इच्छुकांचा भरणा
तासगाव : तासगाव नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्वच पक्षात निवडणुकीची लगीनघाई सुरु झाली आहे. उमेदवार, नेते, कार्यकर्त्यांसह सर्वांचीच जुळवाजुळव सुरू झाली आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा श्रीगणेशा शनिवारपासून होत आहे. शनिवारी भाजपमधील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही मुलाखतीसाठी तयारी सुरु केली आहे. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने, उमेदवारी निश्चित करताना कसरत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे. निवडणुकीसाठी कमी कालावधी असल्याने सर्वच पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपचे नेते खासदार संजयकाका पाटील यांनी शहरातील सर्व प्रभागांचा स्वत: अंदाज घेतला आहे. इच्छुक उमेदवारांचा मोठा भरणा भाजपमध्ये आहे. या सर्व इच्छुकांची मते जाणून घेऊन, इच्छुकांची मुलाखत प्रक्रिया शनिवारपासून सुरु होत आहे. शनिवारी खासदार संजयकाका पाटील यांच्या चिंचणी येथील निवासस्थानी भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत.
राष्ट्रवादीनेही इच्छुकांची चाचपणी पूर्ण केली आहे. शुक्रवारी रात्री आमदार सुमनताई पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंंदे यांची तासगावात कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली. सोमवारपासून राष्ट्रवादीची मुलाखत प्रक्रिया सुरु होणार आहे. तसेच काँग्रेसने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर चार दिवसात दोनवेळा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. गुरुवारी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक झाली. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतरच काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. शिवसेना, शेकाप या पक्षांतूनदेखील पॅनेल उभारण्यासाठी जुळवाजुळव केली जात आहे.
एकंदरीत निवडणुकीच्या हालचाली सर्वच पक्षांत गतिमान झाल्या असून, उमेदवारीसाठी इच्छुकांकडून फिल्डिंग लावली जात आहे. (वार्ताहर)
कामाला लागा : नेत्यांचे आदेश
नगरपालिका निवडणुकीत इच्छुकांचा मोठा भरणा आहे. विशेषत: भाजप आणि राष्ट्रवादीत काही प्रभागात इच्छुकांत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. एकाच जागेसाठी चार ते पाच इच्छुकांनी नेत्यांना साकडे घातल्याचे चित्र आहे. त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता इच्छुकांनादेखील आहे. लवकर उमेदवारी जाहीर केल्यास, अन्य इच्छुकांची नाराजी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाला लागण्याचा कानमंत्र सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून देण्यात आला आहे. मात्र उमेदवारीवर शिक्कामोर्तब ऐनवेळीच होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.