कुपवाडमधील भूखंड विकण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:25 AM2021-08-01T04:25:17+5:302021-08-01T04:25:17+5:30
सांगली : महापालिकेच्या नावे असलेल्या भूखंडावर मूळ मालक म्हणून असलेल्या नोंदीचा गैरफायदा घेत वारस नोंद करण्यात आली आहे. यातून ...
सांगली : महापालिकेच्या नावे असलेल्या भूखंडावर मूळ मालक म्हणून असलेल्या नोंदीचा गैरफायदा घेत वारस नोंद करण्यात आली आहे. यातून हा भूखंड विकण्याचा घाट घालण्यात आल्याची तक्रार नागरिक जागृती मंचच्या वतीने जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नागरिक जागृती मंचचे प्रमुख सतीश साखळकर यांनी यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत महापालिकेच्या भूखंडांचा बाजार होत असल्याचे उघडकीस येत आहे. त्यात आता या भूखंडाची भर पडली आहे. महापालिकेच्या कुपवाड शहरातील मिरज ते माधवनगर जुना रेल्वे मार्गावर असलेल्या या जागेत महापालिकेच्या मालकीचा १६९/१ क हा भूखंड आहे. त्यावर सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिका आयुक्त असे नावही लागले आहे. मात्र, महापालिकेचे नाव लागूनही या जागेच्या भूखंडावर मूळ मालकाचे नावही राहिले आहे. त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने मालकाच्या निधनानंतर त्यांच्या वारसदारांची नावेही लागली आहेत. ही नावे दोन दिवसांपूर्वीच लागली आहेत.
महापालिका प्रशासनाला या गोष्टीचा कसलाही थांगपत्ता नाही. महापालिकेच्या या जागेवर लागलेले मूळ मालकाचे नाव गोल करण्यात यावे आणि या जागेवर अतिक्रमण करून सुरू असलेली नर्सरी तत्काळ काढून टाकावी, अशी मागणी साखळकर यांनी केली आहे.
साखळकर म्हणाले की, महापालिकेला ही जागा २००२ मध्ये ताब्यात मिळाली आहे. जागेच्या उताऱ्यावर महापालिका आयुक्तांचे नावही लागले आहे. मात्र, मूळ मालकाचे नावही तसेच ठेवले आहे. त्याचा गैरफायदा घेत महापालिकेच्या या जागेवर मूळ मालकाचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसदारांची नावे लावण्यात आली आहेत. शिवाय याच जागेत आणि रस्त्यावर अतिक्रमण करून नर्सरी चालविली जात आहे. त्यामुळे रहदारीचा रस्ता बंद झाला आहे. या विरोधात महापालिका आयुक्तांकडे गतवर्षी तक्रार करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनी आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीमध्ये कुपवाड शहरातील मिरज ते माधवनगर जुना रेल्वे
मार्गावर एम.एस.ई.बी. सब स्टेशनच्या शेजारच्या रस्त्यालगत एक नर्सरी आहे. ही नर्सरी महापालिकेच्या मालकीच्या रस्ते व खुल्या जागेत अतिक्रमण करून
सुरू आहे, असे त्यांनी म्हटले आहे.