वकिलाच्या जबड्यात घुसली गोळी
By admin | Published: April 3, 2016 10:50 PM2016-04-03T22:50:05+5:302016-04-03T23:44:13+5:30
सांगलीतील गोळीबार प्रकरण : रिव्हॉल्व्हर जप्त; संशयितास अटक
सांगली : विश्रामबाग येथील डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये शनिवारी रात्री रिव्हॉल्व्हरमधून चुकून उडालेली गोळी दीपक सदाशिव हेगडे (वय २८, रा. वारणाली गल्ली क्रमांक तीन, विश्रामबाग) यांच्या जबड्यात घुसली आहे. सहा तासाच्या शस्त्रक्रियेनंतर ही गोळी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आल्याने हेगडे यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे.
रिव्हॉल्व्हरचे मालक सुरेश कृष्णा गायकवाड (४०, रा. वानलेसवाडी) यांना रविवारी सकाळी विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. त्यांचे रिव्हॉल्व्हरही जप्त केले आहे. दीपक हेगडे व संशयित सुरेश गायकवाड यांचा परिचय नाही. ते डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये बाजार करण्यासाठी गेले होते. गायकवाड यांच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर आहे. ते नेहमी कमरेला लावतात. बाजार केल्यानंतर योगायोगाने दोघेही बिल देण्यासाठी काऊंटरजवळ आले होते. गायकवाड यांच्या कमरेला असलेल्या रिव्हॉल्व्हरला लॉक नव्हते. बिल देण्यासाठी ते पाकीट काढत होते. पण रिव्हॉल्व्हरच्या अडथळ्यामुळे पाकीट निघत नव्हते. त्यामुळे त्यांनी कमरेचे रिव्हॉल्व्हर काढण्याचा प्रयत्न केला. त्याचेवळी ते जोरात खाली पडले. ट्रिगर दाबला गेल्याने एक गोळी उडाली. ती काऊंटरला धडकून शेजारीच उभ्या असलेल्या हेगडे यांच्या उजव्या गालाला लागली.
हेगडे रक्तबंबाळ होऊन जखमी झाले. त्यांना विश्रामबाग येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. गोळीबाराच्या घटनेमुळे पोलिसांची चांगलीच पळापळ झाली. गायकवाड यांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. ते टँकर व्यावसायिक आहेत. त्यांचे रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे. पोलिसांनी त्यांचा रिव्हॉल्व्हरचा परवानाही तपासला आहे. जखमी हेगडे यांचा अद्याप जबाब झालेला नाही.
याप्रकरणी हेगडे यांच्या पत्नी अश्विनी यांनी विश्रामबाग फिर्याद दिली आहे. त्यानुसार गायकवाड यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. त्यांना न्यायालयात उभे केले असताना न्यायालयाने त्यांना ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. हेगडेंच्या जबड्यातून काढलेली गोळी तपासणीला पाठविली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक अनिल चोरमले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सहा तास शस्त्रक्रिया
हेगडे यांची सिटीस्कॅन तपासणी व डोक्याचा एक्से-रे काढण्यात आला. यामध्ये त्यांच्या उजव्या बाजूच्या जबड्यात गोळी घुसल्याचे स्पष्ट झाले. डॉ. शरद सावंत यांनी शस्त्रक्रिया करुन जबड्यातून ही गोळी बाहेर काढली. तब्बल सहा तास शस्त्रक्रिया सुरू होती. हेगडे यांच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.