लोकशाहीच्या विचारधारेवर आक्रमण
By admin | Published: September 2, 2016 11:31 PM2016-09-02T23:31:35+5:302016-09-03T01:06:35+5:30
पृथ्वीराज चव्हाण : काँग्रेसच्या प्रचार प्रारंभात एकजुटीवर विचारमंथन
देवराष्ट्रे : लोकशाहीच्या विचारधारेवर आक्रमण होत आहे. सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही. राज्य सरकार चालवते, की अधिकारी?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांवर हल्ले होत असून, प्रशासनाचा वचक राहिला नसल्याने कायदा सुव्यवस्थेचे धिंंडवडे निघाले आहेत. या व्यवस्थेला फडणवीस सरकार जबाबदार असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
ते देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे काँग्रेसच्यावतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपरिषद यांच्या निवडणूक प्रचार प्रारंभप्रसंगी बोलत होते. या सरकारने जातीयवादाला खत-पाणी घालून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या अशा व्यवस्थेमुळे वैचारिक आक्रमण वाढून लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, माजी आ. सदाशिवराव पाटील, जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, माजी आमदार हाफिज धत्तुरे, सांगलीचे प्रभारी प्रकाश सातपुते, माजी आ. उमाजी सनमडीकर, शैलजा पाटील प्रमुख उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, असंघटित शेतकऱ्यांचा लाभ उठवत दूध व कांद्यासह शेतीमालाचे भाव पाडले आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा विकास थांबवून सर्व निधी व कार्यालये विदर्भाकडे वळविण्याचा घाट सुरू आहे. हा दुजाभाव करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत की विदर्भाचे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. राज्य सरकारमधील १२ दिग्गज मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. लोक संतप्त होऊन मोर्चे काढत आहेत. असे असताना मुख्यमंत्री पक्षांतर्गत विरोधकांचा काटा काढण्यात दंग आहेत. खडसेंना घालवले, मग इतरांना का नाही?
पतंगराव कदम म्हणाले, काँग्रगसने गट-तट बाजूला सारून एका विचाराने निवडणुका जिंकणे गरजेचे आहे. यावेळी प्रतिक पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनीमनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नेते आनंदराव पाटील, डॉ. जितेश कदम, भीमराव मोहिते, इंद्रजित साळुंखे, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब पाटील, महादेव पाटील, ए. डी. पाटील, पी. एम. पाटील, श्रीकांत लाड, सभापती आकांक्षा तांबेवाघ, महेंद्र लाड, सखाराम सूर्यवंशी, सुरेश मोहिते, सतीश पाटील, सुरेश शिंंदे, राजू मोरे, लता महाडिक, विठ्ठल मुळीक, विजय मोहिते उपस्थित होते. (वार्ताहर)
भाषण काँग्रेसचे, साथ शिवसेनेला!
खानापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने एकीचे बळ दाखवले असते, तर चित्र वेगळे दिसले असते. अनेक नेत्यांनी भाषण काँग्रेसचे केले आणि साथ मात्र शिवसेनेला दिली. त्यांच्याबरोबर जायचे नाही आणि तिकडे गेल्याशिवाय राहायचे नाही, अशी अवस्था झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नसून नेत्यांमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम जो दूर क रेल, त्याच्याबरोबर आम्ही आहे, अशी भूमिका माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी व्यक्त केली.