इस्लामपूरच्या रस्त्यावरून पवार बंधूंचा उलटा प्रवास
By admin | Published: July 20, 2016 11:52 PM2016-07-20T23:52:59+5:302016-07-21T00:49:03+5:30
नगरपालिका : शहरातील निकृष्ट दर्जाची कामे बंद पाडून नेमके साधले काय?
अशोक पाटील--इस्लामपूर --पावसाळ्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने शहरातील विविध रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण केले आहे. या कामावर चार कोटी खर्च करण्यात आले आहेत. ही निकृष्ट कामे बंद पाडण्यात माजी नगरसेवक वैभव पवार, त्यांचे बंधू विजय पवार आघाडीवर होते, तरीही निकृष्ट कामे कशी झाली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यातच सत्ताधाऱ्यांनी दोन कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पवार बंधूंनी केला आहे. या सर्व प्रकारावरुन पवार बंधूंनी नेमके काय साध्य केले, असेही विचारले जात आहे.
आघाडी शासनाच्या कालावधित इस्लामपूर पालिकेत तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांनी कोट्यवधीचे अनुदान आणले. त्यातून झालेल्या विकास कामांचा गाजावाजाही करण्यात आला. परंतु पालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी विकास कामांचे तीनतेरा वाजले. आता त्यावेळच्या घोषणाही बासनात गुंडाळल्या गेल्या आहेत. भुयारी गटार, भव्य-दिव्य रस्ते, सुशोभित चौक हे दिवास्वप्नच ठरले आहे.
सत्ताधाऱ्यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांची कामे करून घेतली. परंतु पहिल्याच पावसात या कामांचा दर्जा दिसून आला. ही कामे सुरू असताना पवार बंधूंनी स्वत: लक्ष घातले होते, तरीही रस्त्याचा दर्जा का सुधारला नाही, असा प्रश्न आता सर्वसामान्य करू लागले आहेत.
शहरातील रस्त्यांची कामे सुरू होण्यापूर्वीच याचा ठेका कोणाला दिला आहे, हे सर्वांना ज्ञात होते. परंतु विजय पवार यांना आता साक्षात्कार का झाला आहे? युनिटी बिल्डर्सचे यतीन सावंत यांचे दत्ता देसाई मेहुणे आहेत, तर मेघा बिल्डर्सचे आकाश सावंत हे यतीन सावंत यांचे सख्खे चुलतबंधू आहेत. एकाच घरातील या तीन ठेकेदारांनी निविदा भरली होती. यातील कमी दराची युनिटी बिल्डर्सची निविदा पालिकेने जादा दराने मंजूर केली. या प्रक्रियेची माहिती पवार आणि विरोधकांना आधी नव्हती का, असाही सवाल विचारला जात आहे.
आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांत ताळमेळ नसला तरी, पवार बंधूंनी मात्र निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामावर आवाज उठवून लक्ष वेधून घेतले आहे. परंतु त्यांच्या पाठीशी विरोधकांची ताकद नसल्याने त्यांची सत्ताधाऱ्यांनी दखल घेतलेली नाही. पवार बंधूंना खरोखरच रस्त्यांची चांगली कामे करायची होती, तर निकृष्ट कामे कायमची बंद का पाडली नाहीत? आता त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणे म्हणजे, ‘बैल गेला आणि झोपा केला’ या म्हणीसारखे आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
दर्जेदार रस्ते तयार व्हावेत म्हणून आम्ही नेहमीच आक्रमक होतो. त्यामुळे काही ठिकाणचे रस्ते दर्जेदार झाले आहेत. जेथे आमची उपस्थिती नव्हती, तेथील रस्ते पहिल्याच पावसात खराब झाले आहेत. त्याविरोधात आम्ही कायदेशीर लढाई सुरू केली आहे. या लढाईत आम्हाला न्याय मिळेल यात शंका नाही.
- विजय पवार, अध्यक्ष युवक काँग्रेस, वाळवा
रस्त्यांच्या कामावर झालेल्या खर्चाबाबत सविस्तर माहिती घेऊनच आरोप करावेत. विरोधकांनी काहीही बोलू नये. रस्ते चांगले व्हावेत म्हणून पवार बंधूच कामात अडथळा आणत होते. नंतर मात्र ठेकेदाराची एकांतात गाठभेट झाल्यानंतर रस्त्याची कामे सुरू होत होती. आमच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे आहेत.
- सुभाष सूर्यवंशी, नगराध्यक्ष