'रघुनाथदादांसह शेट्टी, खोत यांच्या संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 01:20 PM2023-10-19T13:20:01+5:302023-10-19T13:21:20+5:30
जन आक्रोश यात्रा साखर कारखानदारांची बटीक
इस्लामपूर : स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांची जन आक्रोश यात्रा साखर कारखानदारांची बटीक बनली असून, ती मलिदा गोळा करण्यासाठी निघाली आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांसाठी किती आंदोलने केली हे सांगावे. त्यामुळे शासनाने रघुनाथदादा पाटील यांच्यासह शेट्टी आणि खोत यांच्या संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करावी, अशी खळबळजनक मागणी रघुनाथदादा प्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी केली.
इस्लामपूर येथे पत्रकार बैठकीत पाटील म्हणाले, शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी आपली मालमत्ता विकून संघटना चालवली. त्यांच्याच मार्गाने रघुनाथदादा पाटील हे संघटना चालवत आहेत. मात्र जोशींपासून वेगळ्या झालेल्या शेट्टी व खोत यांनी संघटना चालवताना स्वत:ची मालमत्ता वाढवली आहे. त्याची चौकशी करावी.
पाटील म्हणाले, गेल्या हंगामात गळीत झालेल्या उसाला दिवाळीपूर्वी १ हजार रूपये द्या. चालू हंगामात येणाऱ्या उसाला ५ हजार रुपयांचा दर द्या. दोन साखर कारखाने आणि इथेनॉल प्रकल्पामधील अंतराची अट काढून टाका. म्हैस दुधाला पेट्रोलचा तर गायीच्या दुधाला डिझेलचा भाव द्या.
ते म्हणाले, या मागण्या मान्य न झाल्यास रघुनाथदादा प्रणीत शेतकरी संघटनेकडून साखर, इथेनॉल, स्पिरिट, मोलॅसिससह भाजीपाला आणि दुधाची वाहतूक रोखून धरणार आहोत.
या वेळी जिल्हा सरचिटणीस धनपाल माळी, माणिकराव पाटील, लक्ष्मण पाटील, केतन जाधव, सयाजी पाटील, महादेव पवार, विकास चिंचोलकर उपस्थित होते.
शेट्टींचे कारखानदारांशी संगनमत
राजू शेट्टी हे नेहमीच आॅक्टोबरमध्ये ऊस परिषद घेत होते. मात्र या वेळी त्यांनी कारखानदारांशी संगनमत करत हंगाम उशिरा सुरू करण्यासाठी आक्रोश यात्रा काढत त्यांना मदतच केली आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांची संघटना कारखानदारांनी पोसलेली आणि पाळलेली आहे, असा आरोप हणमंतराव पाटील यांनी केला.