माती परीक्षण घोटाळ्याची चौकशी करा
By admin | Published: August 1, 2016 12:25 AM2016-08-01T00:25:21+5:302016-08-01T00:25:21+5:30
सदाभाऊ खोत : सांगलीच्या कृषी विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश; ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
सांगली/तासगाव : मृद् आरोग्य अभियानांतर्गत माती परीक्षणात झालेल्या लाखो रुपयांच्या घोटाळाप्रकरणी ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्ह्यात खळबळ माजली. कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत.
शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेनेच हरताळ फासल्याचे चित्र आहे. मातीचे नमुने गोळा करण्यासाठी लोगोसह कापडी पिशवी वापरण्याचे निकष असताना, प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यात आल्या. पिशवीची बाजारभावाप्रमाणे किंमत एक रुपयाही नसताना अकरा रुपये किंमत दाखवण्यात आली आहे. अशा एक नव्हे, तर अनेक प्रकारच्या साहित्य खरेदीत गौडबंगाल असल्याची चर्चा होत असून, लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मातीच्या आरोग्यालाच भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे दिसून येत आहे. यावर्षी मे महिन्यापासूनच जिल्हा मृद् सर्व्हेक्षण विभाग आणि कृषी विभागामार्फत माती तपासणीसाठी मोहीम राबवण्यात आली होती. यावर्षी जिल्ह्यातील ६१४ गावांतून ६९ हजार ९०५ मातीच्या नमुन्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ६३ हजार १८० नमुने गोळा करण्यात आले आहेत. मृद् सर्वेक्षण विभागाकडून मिळालेल्या नमुन्यापैकी जवळपास अठरा हजार नमुन्यांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. तर केवळ सुमारे दोन हजार नमुन्यांचे अहवाल तयार झाले आहेत.
भ्रष्टाचाराच्या या प्रकरणावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर पणनमंत्र्यांनीही याची दखल घेतली. सांगलीत कृषी अधीक्षकांच्या कार्यालयास भेट दिल्यानंतर त्यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याबाबतचा अहवाल सादर करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे. यावेळी कृषी अधीक्षक उमेश पाटील, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, उपविभागीय अधिकारी मकरंद कुलकर्णी उपस्थित होते.
मातीचे नमुने तपासणी करून मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी कृषी विभाग आणि मृद चाचणी विभागाकडून राबवण्यात आलेली मोहीमच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ‘लोकमत’मध्ये ‘मातीच्या आरोग्याला भ्रष्टाचाराची कीड’ या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द करण्यात आल्यानंतर जिल्हाभरात खळबळ उडाली. अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी माती तपासणीची अंमलबजावणीच काटेकोरपणे झाली नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी तपासणी अहवालाबाबत शेतकरीच अनभिज्ञ आहेत.
दोषींवर कारवाई : शेतकऱ्यांतून अपेक्षा
जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अनेक कामांत नियम धाब्यावर बसवून कामकाज सुरू आहे. माती तपासणीबाबतचे काम हा त्यातीलच एक नमुना आहे. मात्र कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचारी कारभाराबाबत कोणतीच कारवाई गांभीर्याने केली जात नसल्याचे आतापर्यंतचे चित्र होते. आता शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत हेच कृषी राज्यमंत्री आहेत. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे किमान यावेळी तरी नि:पक्षपातीपणे तपासणी करुन दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.