चौकशी अधिकाऱ्यांची होणार सरतपासणी
By admin | Published: November 7, 2015 11:14 PM2015-11-07T23:14:08+5:302015-11-07T23:44:49+5:30
जिल्हा बॅँक घोटाळा : जाधव यांच्याकडून प्रतिज्ञापत्र
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील १५७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी कलम ८३ ची चौकशी अधिकारी डॉ. एस. एन. जाधव यांनी शनिवारी सध्याचे चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांच्याकडे प्रतिज्ञापत्र सादर केले. पुढील सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी होणार असून, त्यावेळी जाधव यांची सरतपासणी होणार आहे. लेखापरीक्षक एस. एस. चोथे यांनी अद्याप प्रतिज्ञापत्र सादर केले नसून, त्यांना २८ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
जिल्हा बॅँकेतील १५७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी तत्कालीन लेखापरीक्षक व चौकशी अधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. शनिवारी याप्रकरणी चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांच्यासमोर आरोपपत्रावरील सुनावणी शनिवारी पार पडली. यावेळी जाधव यांनी आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये त्यांनी केलेली चौकशी, पडताळण्यात आलेली कागदपत्रे आणि नियमांचा दाखला दिला आहे. चोथे यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास २८ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पुढील सुनावणीवेळी प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने जाधव यांची सरतपासणी होणार आहे.
जिल्हा बॅँकेतील १५७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी गुंजाळ यांनी ९६ पानी आरोपपत्र यापूर्वी दाखल केले आहे. माजी संचालक, तत्कालीन अधिकारी, मृत संचालकांचे वारसदार अशा शंभरजणांचा यात समावेश आहे. याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी लेखी अथवा तोंडी म्हणणे पुराव्यासह सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पहिल्या सुनावणीवेळी तत्कालीन दोन संचालक, दोन वारसदार, एक कार्यकारी संचालक व दोन व्यवस्थापक अशा सातजणांनी चौकशी अधिकाऱ्यांसमोर म्हणणे सादर केले. नऊजण सुनावणीला गैरहजर राहिले. ८४ लोकांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ मागितली. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यामुळे आरोपपत्रावरील सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. न्यायालयीन आदेशानुसार कोणताही निर्णय यामध्ये घेता येणार नाही.
चौकशी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात सुनावणीची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. यापूर्वीचे लेखापरीक्षक व चौकशी अधिकारी यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना गुंजाळ यांनी दिली होती. त्यानुसार एक प्रतिज्ञापत्र सादर झाले आहे. (प्रतिनिधी)