सांगली जिल्हा बँकेतील कारभाराची चौकशी सुरू, कागदपत्रांची छाननी; ३१ जानेवारीपर्यंत अहवाल सादर करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 01:48 PM2023-01-13T13:48:28+5:302023-01-13T13:49:09+5:30

दोन महिन्यांपूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सहकारमंत्र्यांकडे बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली होती.

Investigation into the affairs of Sangli District Bank is underway, documents are being scrutinized | सांगली जिल्हा बँकेतील कारभाराची चौकशी सुरू, कागदपत्रांची छाननी; ३१ जानेवारीपर्यंत अहवाल सादर करणार

संग्रहीत फोटो

googlenewsNext

सांगली : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहाराच्या तक्रारीची चौकशी गुरुवारपासून सुरू करण्यात आली आहे. विभागीय सहनिबंधकांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांच्या समितीने तक्रारीच्या अनुषंगाने बँकेतील अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी केली.

विभागीय सहनिबंधक डी. टी. छत्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील पथकात विशेष लेखापरीक्षक शीतल चोथे, संजय पाटील, अनिल पैलवान, द्वितीय अपर लेखापरीक्षक रघुनाथ भोसले यांचा समावेश आहे. तक्रारीनुसार प्राथमिक माहिती घेऊन कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. चौकशी अहवाल पूरक कागदपत्रांसह दि. ३१ जानेवारीपर्यंत सादर केला जाणार आहे. त्यामुळे पथकातील अधिकारी पुन्हा बँकेत येऊन संबंधित तक्रारीच्या मुद्द्यांची चौकशी करणार असल्याचे समजते.

बँकेच्या कारभाराबाबत स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी जिल्हा बँकेतील कारभाराबाबत सहकार आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली होती. याप्रकरणी चौकशीचे आदेश यापूर्वी दिले होते. परंतु चौकशीला २३ सप्टेंबर २०२१ रोजी महाविकास आघाडी सरकारकडून स्थगिती देण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सहकारमंत्र्यांकडे बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर चौकशीचे आदेश देऊन समिती नियुक्त करण्यात आली आहे.

बँकेकडून सरफेसी कायद्यांतर्गत कर्जदार संस्थांची मालमत्ता विक्री, संस्था, कंपनी व महिला बचत गटाचे ६० कोटींचे कर्ज निर्लेखित करणे, तत्कालीन संचालकांच्या कारखान्यास ३२ कोटी रुपयांचे कर्ज शिफारस नसताना देणे, स्वप्नपूर्ती शुगर्स लिमिटेड कारखान्यास चुकीच्या पद्धतीने २३ कोटी रुपये कर्ज वाटप, २१ तांत्रिक पदांची बोगस कागदपत्रांच्या आधारे भरती आदींबाबत तक्रार केली होती. या सर्व प्रकरणांची चौकशी समितीकडून केली जाणार आहे.

Web Title: Investigation into the affairs of Sangli District Bank is underway, documents are being scrutinized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.