Sangli News: आटपाडी सूतगिरणी व्यवहाराची चौकशी सुरु, बँकेच्या आजी-माजी अधिकाऱ्यांना प्रकरण भोवणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 05:59 PM2023-02-02T17:59:42+5:302023-02-02T18:00:19+5:30
आटपाडीतील ४० कोटी रुपयांची बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणीची अवघ्या १४ कोटी रुपयांत विक्री
सांगली : आटपाडीतील ४० कोटी रुपयांची बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी अवघ्या १४ कोटी रुपयांत विकण्याच्या प्रकरणाची चौकशी शासनामार्फत सुरु करण्याचे आदेश सहकार विभागाने बुधवारी चौकशी समितीला दिले. सध्या बँकेत सुरु असलेल्या चौकशीमध्ये या प्रकरणाचा समावेश करुन त्याचा अहवाल येत्या २८ फेब्रुवारीस सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे.
आटपाडीतील सूतगिरणीच्या व्यवहार बाबत यापूर्वीच शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाने बँकेच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. शासकीय देण्यांचा विचार न करता हा व्यवहार केल्यामुळे महामंडळाने नाराजी व्यक्त केली होती. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळानेही हा व्यवहार चुकीचा झाल्याबाबत स्षष्ट केले आहे. स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी आटपाडीतील या व्यवहाराची ही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे केली होती. त्याची दखल घेत सहकार विभागाने चौकशीचे आदेश दिले. सहकार विभागाचे अपर आयुक्त ज्ञानदेव मुकणे यांनी बुधवारी याबाबतचे आदेश काढले.
सध्या जिल्हा बँकेत जुन्या संचालक मंडळाच्या काळातील व्यवहारांची चौकशी सुरु आहे. या चौकशी बरोबरच आटपाडीच्या सूतगिरणी व्यवहाराची चौकशी करण्यात यावी. २८ फेब्रुवारीस त्यांचा अहवाल सादर करावा, असे पत्रात म्हटले आहे.
आटपाडीचे प्रकरण अडचणीचा विषय
आटपाडीतील सूतगिरणीच्या व्यवहारामुळे बँकेच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेषतः आजी-माजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे प्रकरण भोवण्याची शक्यता आहे.
या प्रकरणांची चौकशी दुसऱ्या टप्प्यात
बँकेकडून सरफेसी कायद्यांतर्गत कर्जदार संस्थांची मालमत्ता विक्री, संस्था, कंपनी व महिला बचत गटाचे ६० कोटींचे कर्ज निर्लेखित करणे, तत्कालीन संचालकांच्या कारखान्यास ३२ कोटी रुपयांचे कर्ज शिफारस नसताना देणे, स्वप्नपूर्ती शुगर्स लिमिटेड कारखान्यास चुकीच्या पद्धतीने २३ कोटी रुपये कर्ज वाटप, २१ तांत्रिक पदांची बोगस कागदपत्रांच्या आधारे भरती आदींबाबत तक्रार केली होती. या प्रकरणांच्या चौकशीचा दुसरा टप्पा सुरु आहे.