राज्यभरात ३५९ दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 01:31 PM2024-09-14T13:31:05+5:302024-09-14T13:31:46+5:30

दिव्यांग कल्याण आयुक्तांचा आदेश; सांगलीत ५, कोल्हापुरात ८, साताऱ्यात १२ कर्मचारी

Investigation of certificates of 359 disabled employees across the state is underway | राज्यभरात ३५९ दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू

राज्यभरात ३५९ दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू

सांगली : कथित आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या दिव्यांग प्रमाणपत्रामधील बोगसगिरी उजेडात आल्यानंतर महाराष्ट्रभरात चौकशी सत्र सुरू झाले आहे. दिव्यांगांसाठीच्या राखीव जागेवर नोकरी मिळविलेल्या ३५९ उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसा आदेश दिव्यांग कल्याण आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

यासंदर्भात ‘दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी शासनाकडे चौकशीची मागणी केली होती. राज्यभरातील कथित बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी त्यांनी शासनाला दिली असून, त्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील काही कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. बोगस उमेदवारांमुळे दिव्यांगांवर अन्याय होत असून, ते नोकरीपासून वंचित राहत आहेत, त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या धर्तीवर दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी मध्यवर्ती समिती स्थापन करण्याची मागणी कडू यांनी केली आहे.

कडू यांनी १९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान राबविले होते, त्यातून शासकीय व निमशासकीय विभागांत ३५९ बोगस उमेदवार आढळले आहेत. ही यादी त्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे दिली. त्यानुसार आयुक्तांनी यादीतील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राच्या चौकशीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

साताऱ्यात १२, कोल्हापुरात आठ संशयित प्रमाणपत्रे

बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाला सादर केलेल्या यादीनुसार सातारा जिल्ह्यात १२, कोल्हापूर जिल्ह्यात आठ व सांगली जिल्ह्यात पाच दिव्यांग शासकीय व निमशासकीय सेवेत आहेत. त्यांची दिव्यांगत्वाची प्रमाणपत्रे बोगस असल्याचा संशय आहे. कृषी, महसूल, उपप्रादेशिक परिवहन, आदी विभागांत ते कार्यरत आहेत.

शासकीय, निमशासकीय विभागांत गेल्या काही वर्षांत दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिव्यांगांसाठीच्या सवलतींचा ते लाभही घेत आहेत. त्यांच्या कायमस्वरूपी दिव्यांग प्रमाणपत्रांविषयी शंका येण्यासारखी स्थिती आहे. -रवींद्र सोनवणे, अध्यक्ष, प्रहार दिव्यांग शासकीय, निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटना

Web Title: Investigation of certificates of 359 disabled employees across the state is underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.