गौण खनिज वाहतुकीमुळे अपघाताला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:35 AM2020-12-30T04:35:08+5:302020-12-30T04:35:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात गौण खनिज वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या मागील दुचाकीस्वारांच्या डोळ्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात गौण खनिज वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या मागील दुचाकीस्वारांच्या डोळ्यात खनिजाचे छोटे कण जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी मदनभाऊ युवा मंचच्यावतीने करण्यात आली. याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे म्हणाले की, मुरूम, माती, खडी, वाळू, वीट या गौण खनिजाची वाहतूक होत असताना, या वाहनाच्या मागून जाणाऱ्या दुचाकीस्वारांच्या डोळ्यात गौण खनिजाचे छोटे कण जाऊन अनेक अपघात झालेले आहेत. काही जण कायमचे अधू झालेले आहेत, तर काही जणांना प्राणही गमवावे लागलेले आहेत. शेजारील राज्यात गौण खनिजाची वाहतूक बंदिस्त ताडपत्री टाकून पाणी मारून केली जाते, तर महाराष्ट्रात का नाही? उघड्यावर गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा न्यायालयीन लढा उभा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी युवा मंचचे उपाध्यक्ष शेखर पाटील, महापालिका क्षेत्र अध्यक्ष तौफिक बिडीवाले, ओबीसी शहराध्यक्ष जुनेद महात, अक्षय दोडमनी, दिनेश सादीलगे, अजय पवार, राम खुट्टे, नितीन भगत, चंदू जगताप, प्रकाश गावडे आदी उपस्थित होते.