कास सांडव्याजवळील कडा देतोय अपघातांना निमंत्रण
By Admin | Published: May 9, 2017 11:28 PM2017-05-09T23:28:17+5:302017-05-09T23:28:17+5:30
कास सांडव्याजवळील कडा देतोय अपघातांना निमंत्रण
लोकमत न्यूज नेटवर्क
पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या सांडव्या शेजारील उंच कडा संरक्षक जाळीविना धोकादायक बनत चालला आहे. मृत्यूला आव्हान देणाऱ्या या कड्याची पर्यटकांच्या सूरक्षिततेच्या दृष्टीने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.
कासकडे शाळा व महाविद्यालयांना उन्हाळी सुटी लागल्याने पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. कित्येक पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत तसेच शाळा महाविद्यालयीन तरूणाई कास तलावावर पर्यटनासाठी येवू लागली आहेत.
अनेक पर्यटक तलावाच्या सांडव्याशेजारील परिसरात चुली मांडुन पार्ट्या झोडत आहेत. परंतु या साडंव्या शेजारी वीस ते पंचवीस फूट उंचीचा असुरक्षित कडा असून नवख्या पर्यटकांना त्याचा अंदाज येत नाही. लहान मुले नजर चुकवून खेळण्याच्या नादात या कड्याजवळ जाताना दिसत आहेत. या धोकादायक कड्याला सुरक्षा रेलिंग नसल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पावसाळ्यात कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या वेगाने पाणी वाहू लागते. सांडव्यावरून वाहनारे हे पाणी पाहण्यासाठी अतिउत्साही पर्यटक या कड्याजवळ येवून फोटोसेशन करत असतात. पावसाळ्यात दाट धुके, जोरदार वाहणारा वारा तसेच या ठिकाणच्या परिसरातील जमीन घसरडी होते. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कड्यापासून सांडव्यासमोरील पुलापर्यंत एका बाजूने संरक्षक जाळी अथवा कठडे उभारण्यात यावे, अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.