महापूर उपाययोजनांकडे 'जलसंपदा' खात्याकडून दुर्लक्ष, मेधा पाटकर येत्या शनिवारी सांगलीत येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 01:34 PM2021-12-23T13:34:29+5:302021-12-23T17:26:38+5:30
महापूर प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी येत्या शनिवारी दि. २५ रोजी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर सांगलीत येणार आहेत.
सांगली : केंद्रीय जलआयोगाच्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, महाराष्ट्र-कर्नाटकात समन्वय ठेवावा यासह अनेक उपाययोजना कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सूचविल्या आहेत. पण, याकडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप समितीने केला आहे. या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी दि. २५ रोजी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरसांगलीत येणार आहेत.
कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीमध्ये सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, डॉ. रवींद्र होरा, वास्तुविशारद प्रमोद चौगुले, हणमंतराव पवार, सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, सर्जेराव पाटील, सुकुमार पाटील, संजय कोरे, कोल्हापूरचे उदय गायकवाड यांचा समावेश आहे. या समितीने पाटबंधारे विभागाकडे विविध उपाययोजना सूचविल्या आहेत.
केंद्रीय जल आयोगाने धरणातील पाणी सोडण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या असून, त्यांचे तंतोतंत पालन झाले पाहिजे. महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांत नियमित समन्वय ठेवण्याची गरज आहे. अलमट्टी धरणातील पाणीपातळी ५१६ मीटरपेक्षा जास्त असू नये. पूररेषेतील नदीकाठावरील बांधकाम अडथळे, काही पुलांचे अडथळे, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील न काढलेले बरगे हीसुद्धा पुराची कारणे आहेत. या सूचनांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. परंतु, पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि शासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना फटका बसत आहे.
मेधा पाटकर शनिवारी सांगलीत येणार
तज्ज्ञांनी कृष्णा खोऱ्याचा अभ्यास दौरा करून अहवाल तयार केला आहे. त्याची राज्य आणि केंद्र शासनाने दखल घ्यावी, यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर प्रयत्न करणार आहेत. त्या दि. २५ डिसेंबर रोजी सांगलीत येणार असून, कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, असे सर्जेराव पाटील यांनी सांगितले.