पाटबंधारे विभागातील अधिकारीच बनले ठेकेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:25 AM2021-05-16T04:25:18+5:302021-05-16T04:25:18+5:30

सांगली : पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनीच नातेवाइकांच्या नावावर फर्मची नोंदणी करून म्हैसाळ, ताकारी उपसा सिंचन योजनांची कामे मिळविली आहेत. ठराविक ...

Irrigation department officials became the contractors | पाटबंधारे विभागातील अधिकारीच बनले ठेकेदार

पाटबंधारे विभागातील अधिकारीच बनले ठेकेदार

googlenewsNext

सांगली : पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनीच नातेवाइकांच्या नावावर फर्मची नोंदणी करून म्हैसाळ, ताकारी उपसा सिंचन योजनांची कामे मिळविली आहेत. ठराविक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळली जात असल्यामुळे कोट्यवधींची कामे मिळविण्यात ठेकेदार अधिकारी यशस्वी होत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून नातेवाइकांच्या संस्थेला कोणतेही काम देऊ नये, असा शासनाचा नियम आहे. प्रत्यक्षात त्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. म्हैसाळ, ताकारी आणि टेंभू योजनेतील कामे ठराविक संस्थांच्या नावेच होत आहेत. चार ते पाच कोटींच्या कामाचे टप्पे पाडून घेतले जात आहेत. ताकारी, म्हैसाळ योजनांची कामे संबंधित अधिकाऱ्यांच्या संस्थांनी केली आहेत. या कामाचे सामाजिक लेखापरीक्षण केल्यास घोटाळा उघडकीस येऊ शकतो, असा दावा काही अधिकारीच करीत आहेत. ठेकेदारीतील वरिष्ठ अधिकारी अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांशी व्यवस्थित बोलत नाहीत, अशा तक्रारी आहेत. ठेकेदारीतून वरिष्ठ अधिकारी, काही लोकप्रतिनिधींची मर्जी सांभाळली जात आहे. अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ठेकेदारीतील अधिकारी काहीच किंमत देत नसल्यामुळे त्यांच्या विरोधात असंतोष आहे.

चौकट

पाणीपट्टीतही घोटाळा

सिंचन योजनांच्या पाणीपट्टी वसुलीचा स्वतंत्र विभाग आहे; पण स्वतंत्र यंत्रणा नसल्यामुळे वसुलीचे ठोस नियोजन होत नाही. शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करून ठराविक अधिकाऱ्यांकडे दिले जातात. या पैशांची पावती मिळाली नसल्यामुळे वसुलीत काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी डल्ला मारल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

चौकट

नोकरीचा सर्व कार्यकाल एकाच ठिकाणी

काही वरिष्ठ अधिकारी नोकरी लागल्यापासून सांगली पाटबंधारे विभागातच ठाण मांडून आहेत. जिल्ह्याबाहेर बदली झाल्यानंतरही तीन वर्षे सांगलीचा प्रभारी पदभार घेऊन येथील खुर्ची त्यांनी सोडलेली नाही. बदलीच्या ठिकाणी कधी फिरकलेच नाहीत. नंतर पुन्हा सांगलीत नियमित बदलीही करून घेतली. आता सहा वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतरही मुदतवाढीसाठी संबंधित अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Irrigation department officials became the contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.