आयर्विन पुलाचा ९० वा वाढदिवस साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 02:49 AM2019-11-19T02:49:27+5:302019-11-19T02:49:34+5:30
सांगलीकरांंनी केला ‘हॅप्पी बर्थ डे’चा जल्लोष; १०४ वर्षांच्या लक्ष्मी आजींचाही गौरव
सांगली : सांगलीचा ऐेतिहासिक वारसा ठरलेल्या कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाने सोमवारी वयाची नव्वदी पूर्ण केली. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अवघ्या सांगलीकरांनी संध्याकाळी पुलावर गर्दी केली होती. पुलाच्या उभारणीसाठी राबलेल्या १०४ वर्षांच्या लक्ष्मीबाई पुजारी यांची उपस्थिती कार्यक्रमाचा उत्साह वाढवणारी ठरली.
ब्रिटिशकाळात १८ नोव्हेंबर १९२९ रोजी सांगलीकरांसाठी खुल्या झालेल्या आयर्विन पुलाने नव्वद वर्षे अखंड सेवा दिली. कोणतीही पडझड किंवा संकट न ओढवता सांगलीकर निश्चिंत मनाने पुलावरुन प्रवास करत राहिले. त्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण सांगलीकरांनी आज नव्वदीनिमित्त केले.
महापौर संगीता खोत यांच्यासह अनेकजण आजच्या क्षणाचे साक्षीदार ठरले. पुलाच्या शिलालेखासमोर आकर्षक रांगोळी व पणत्यांची सजावट केली होती. पुलाची ओवाळणी करुन व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. पुलाच्या प्रत्यक्ष उभारणीत राबलेल्या लक्ष्मीबार्इंना कार्यक्रमाचे खास निमंत्रण होते. त्यांच्याकडून पुलाच्या बांधकामाचे टप्पे अनेकांनी जाणून घेतले.
लक्ष्मीबाई सध्या नातेवाईकांसोबत भाड्याच्या घरात राहतात. महापालिका त्यांना विश्ोष बाब म्हणून घरकुल देण्यासाठी पुढाकार घेईल, असे महापौर संगीता खोत यांनी सांगितले.
मोबाईलचे फ्लॅश आणि सेल्फीसाठी गर्दी
आयर्विनच्या वाढदिवसाचा क्षण टिपण्यासाठी मोबाईलचे फ्लॅश अखंड चमकत होते. १०४ वर्षांच्या लक्ष्मी आजी सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरल्या. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी प्रत्येकजण धडपडत होता. वयाच्या या टप्प्यावरही त्या अनेक बारीकसारीक प्रसंग आठवून सांगत होत्या.