बाप रे! एकट्याने तोडला एक-दोन नव्हे तर १६ टन ऊस, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याचा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 05:28 PM2022-01-14T17:28:56+5:302022-01-14T17:52:42+5:30
दोन बिस्किट पुडे आणि ताक पिऊन त्यांनी २० गुंठ्यातील १६ टन ऊस तोडला.
तांदुळवाडी : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे ऊसतोड मजूर ईश्वर रामचंद्र सांगोलकर (वय ५०) यांनी एकट्याने एका दिवसात २० गुंठ्यातील १६ टन ऊस तोडून विक्रम केला. याबद्दल वारणा साखर कारखाना प्रशासनाने त्यांचा सत्कार केला.
वारणा साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामासाठी कुंडलवाडी येथील संजय फाटक यांनी ऊसपुरवठा करण्यासाठी ट्रॅक्टरचा करार केला आहे. या ट्रॅक्टरवर खैराव (ता. जत) येथील ऊसतोड मजुरांची टोळी आहे. याच टोळीतील ईश्वर सांगोलकर यांचाही सहभाग आहे. सांगोलकर यांनी अशोक सावंत यांच्या शेतात एका दिवसात एकट्याने १६ टन ऊस तोडण्याचा विक्रम केला आहे.
त्यांनी केलेल्या या विक्रमाची वारणा कारखाना प्रशासनानेही दखल घेतली आहे. कारखान्याचे शेती अधिकारी प्रमोद पाटील, ऊस अधिकारी विजय कोळी शेती, गट अधिकारी अक्षय तोडकर, शेती मदतनीस प्रताप भोसले यांनी ईश्वर सांगोलकर यांचा थेट उसाच्या फडात जाऊन सत्कार केला.
दिवसभरात खाली केवळ दोन बिस्किट पुडे
ईश्वर सांगोलकर यांनी दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी अशोक सावंत यांच्या शेतात हा ऊस तोडणीचा विक्रम केला आहे. दिवसभरात केवळ दोन बिस्किट पुडे आणि ताक पिऊन त्यांनी २० गुंठ्यातील १६ टन ऊस तोडला.