इस्लामपुरात कमळाला बोचतोय धनुष्यबाण

By admin | Published: June 9, 2016 01:11 AM2016-06-09T01:11:56+5:302016-06-09T01:14:32+5:30

विरोधकांच्या मोट बांधणीवर प्रश्नचिन्ह : पालिका निवडणुकीत सवतासुभा मांडण्याची तयारी

Islamophobia bowl lotus bowl | इस्लामपुरात कमळाला बोचतोय धनुष्यबाण

इस्लामपुरात कमळाला बोचतोय धनुष्यबाण

Next

अशोक पाटील -- इस्लामपूर --नगरपालिकेच्या मागील निवडणुकीत भाजप, काँग्रेस, स्वाभिमानी आणि महाडिक युवा शक्तीने एकत्रित येऊन राष्ट्रवादीला आव्हान दिले होते, तर शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यामुळेच विरोधकांच्या १० ते १२ उमेदवारांना फटका बसला होता. आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षाचे नेते पुन्हा स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे विरोधकांची मोट कोण बांधणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मागील वेळी स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, शिवाजीराव नाईक आणि नानासाहेब महाडिक यांनी शहरातील बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रम पाटील, वैभव पवार आणि इतर पक्षांना एकत्रित करुन राष्ट्रवादीला आव्हान दिले होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी सवतासुभा मांडत धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यांनी काही प्रभागात शिवसेनेचे उमेदवार दिले होते. त्यामुळे बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रम पाटील, वैभव पवार यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता या सर्वच नेत्यांत अंतर्गत मतभेद आहेत.
त्यामुळे आगामी निवडणुकीतही भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा करत आहेत, तर खासदार शेट्टी आणि आमदार नाईक यांच्यासह राहुल महाडिक, सम्राट महाडिक हे सर्व विरोधकांना एकत्रित करण्याच्या तयारीला लागले आहेत.
पालिकेत भाजपचे विरोधी पक्षनेते विजय कुंभार सक्रिय आहेत. विरोधकांची ताकद नसली तरी, सत्ताधाऱ्यांविरोधात फक्त लेखी तक्रारी करून विरोधकांची बाजू मांडण्याचा उद्योग त्यांनी कायम ठेवला आहे. महाडिक युवा शक्तीचे नगरसेवक कपिल ओसवाल प्रभागातील नागरिकांच्या तक्रारींचे निवारण न करता व्यवसायातच लक्ष घातले आहे. परंतु त्यांच्याकडे मदतीसाठी येणाऱ्यांना ते मोकळ्या हाताने पाठवत नाहीत. आनंदराव पवार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असल्याने त्यांना वारंवार दौऱ्यावर जावे लागते. त्यामुळे त्यांचे शिलेदार शहराध्यक्ष शकील सय्यद पालिकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात लुटूपुटूच्या लढाया खेळत असतात.
भाजपचे विक्रम पाटील हरल्यानंतर थोडे दिवस अज्ञातवासात गेले होते. परंतु केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांना चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे ते आता पक्ष वाढवण्याच्या कामात व्यस्त आहेत. सध्या तरी ते पालिकेच्या धोरणाविषयी बोलत नाहीत. परंतु आगामी निवडणुकीत सर्व प्रभागात भाजपचे उमेदवार देण्याच्या हालचाली त्यांच्याकडून सुरू आहेत.
खासदार शेट्टी यांनी विरोधकांची मोट बांधण्याची भाषा सुरू केली आहे, तर त्यांचे सहयोगी पक्ष असलेले भाजप, शिवसेना वेगळी भाषा बोलू लागले आहेत. पालिका निवडणूक काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. त्या सर्वांचे मनोमीलन करण्यासाठी शेट्टी यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
अनेक विरोधी नेत्यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. यामुळे आगामी निवडणूक कोणता रंग घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. विरोधकांची मोट कोण बांधणार, त्यांचे नेतृत्व कोण करणार, आदी प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत.

Web Title: Islamophobia bowl lotus bowl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.