इस्लामपुरातील प्रभागांत ‘घुसखोरी’
By admin | Published: October 7, 2016 10:43 PM2016-10-07T22:43:25+5:302016-10-07T23:50:43+5:30
नगरपालिका निवडणूक : आनंदराव मलगुंडे-शहाजीबापू पाटील यांची एकाच ठिकाणी दावेदारी
अशोक पाटील--इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीसाठी काही प्रभाग खुले झाले आहेत. तेथे इतर प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी घुसखोरी करण्याचा डाव आखला आहे. प्रभाग १३ खुला आहे, त्यामुळे स्वीकृत नगरसेवक शहाजी पाटील यांनी तेथून निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे. परंतु ओबीसी प्रवर्गातील आनंदराव मलगुंडे यांनीही या प्रभागावर दावा केला आहे.
इस्लामपूरचे नगराध्यक्षपद जनतेतून निवडावयाचे आहे. त्यातच या पदाचे आरक्षण खुले झाल्याने पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. प्रभाग १३ व १४ हा विजय पाटील यांचे वर्चस्व असणारा प्रभाग असल्याने, येथून निवडून येण्यास अडचण येणार नाही, हे डोळ्यासमोर ठेवून त्यांचेच चुलत बंधू शहाजी पाटील यांनी प्रभाग १३ मधूनच निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे.
पक्षप्रतोद विजय पाटील आणि माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. ११-१२ च्या राजकारणात आनंदराव मलगुंडे यांना नगराध्यक्षपद देण्यात विजय पाटील यांचाच पुढाकार होता.
प्रभाग १३ मध्ये काही बदल होऊन मलगुंडे यांच्या मूळ प्रभागातील मतदारांचा प्रभाग १३ मध्ये समावेश झाला आहे. नगराध्यक्षपद ओ.बी.सी. पडले असते, तर मलगुंडे नगराध्यक्ष पदाचे दावेदार होते. परंतु आता त्यांना पुन्हा नगरसेवक पदावरच थांबावे लागणार आहे. त्यामुळेच त्यांनी विजय पाटील यांचे वर्चस्व असलेल्या प्रभाग १३ मधून पालिका निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
आधी पाहणी : नंतर निवडणूक लढविणार
आम्ही दोघेही माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक आहोत. अण्णासाहेब डांगे हे माझे नेते आहेत. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण खुले झाल्यानंतर आपण प्रभाग १३ ची पाहणी करुन, येथूनच निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे. मतदारांच्या याद्याही मी मिळविल्या आहेत. शहाजी पाटील यांचे नुकसान होणार नाही याची व्यवस्था करणार असल्याचे आश्वासन नगरसेवक आनंदराव मलगुंडे यांनी दिले.
आमचे नेते विजयभाऊ पाटील यांना उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे मी त्यांचे वर्चस्व असलेल्या प्रभाग क्र. १३ मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. सध्या माझ्याकडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद आहे. त्यामुळे माझ्या निर्णयाचा विचार घेतला जाणार आहे. विचारविनिमय करुन निर्णय घेऊ.
- शहाजीबापू पाटील, नगरसेवक