इस्लामपुरात सहायक फौजदाराला मारहाण-रंगपंचमीत हुल्लडबाजी : शासकीय कामात अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:46 PM2019-03-25T23:46:10+5:302019-03-25T23:47:26+5:30
रंगपंचमी खेळताना आरडाओरडा करून हुल्लडबाजी करणाऱ्या युवकास पकडणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकास कानाखाली मारून धक्काबुक्की करण्याचा प्रकार सोमवारी इस्लामपुरात घडला. याप्रकरणी अभिजित अजितकुमार शिंदे
इस्लामपूर : रंगपंचमी खेळताना आरडाओरडा करून हुल्लडबाजी करणाऱ्या युवकास पकडणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकास कानाखाली मारून धक्काबुक्की करण्याचा प्रकार सोमवारी इस्लामपुरात घडला. याप्रकरणी अभिजित अजितकुमार शिंदे (वय २६, रा. अभियंतानगर, इस्लामपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने सहायक पोलीस निरीक्षक गणेशप्रसाद मुरलीधर भरते यांना मारहाण केली.
सोमवारी रंगपंचमी असल्याने पोलीस निरीक्षक एन. एस. देशमुख यांच्यासमवेत भरते व इतर कर्मचारी शहरातून गस्त घालत होते. बसस्थानक परिसरातील अहिंसा चौकात काही युवक रंगपंचमी खेळताना आरडाओरड करत हुल्लडबाजी करत होते. रस्त्याने येणाºया-जाणाºया लोकांच्या अंगावर रंग टाकत होते. हा प्रकार पाहून पोलिसांनी त्यांना अटकाव केला. यावेळी अभिजित शिंदे हा त्याच्या दुचाकीवरून (क्र. एमएच १० बीके ४१) आरडाओरडा करीत होता. सहायक पोलीस निरीक्षक भरते यांनी त्याच्याकडे वाहन परवाना आणि कागदपत्राबाबत विचारणा केली. शिंदे याने कागदपत्रे नाहीत, परवाना डुप्लिकेट आहे, असे सांगून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर पथक त्याला वाहनासह पोलीस ठाण्यात घेऊन येत असताना, काही अंतरावर अभिजित शिंदे याने सहायक पोलीस निरीक्षक भरते यांच्याशी वादावादी सुरु केली. त्याने भरते यांच्या कानाखाली मारून धक्काबुक्कीही केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गणेशप्रसाद भरते यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पाठलाग करून पकडले
भरते यांना मारहाण करून शिंदे पळून जाऊ लागला. यावेळी इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून पोलीस कर्मचाºयास मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.