इस्लामपूर, बोरगाव-रेठरेहरणाक्ष परिसरात ‘रयत’चे ‘सहकार’ला आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:18 AM2021-06-17T04:18:25+5:302021-06-17T04:18:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : ‘कृष्णे’च्या रणसंग्रामात रयत आणि संस्थापक पॅनलच्या मनोमिलनाचे गुऱ्हाळ अखेर थांबले. त्यानंतर सहकार राज्यमंत्री विश्वजित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : ‘कृष्णे’च्या रणसंग्रामात रयत आणि संस्थापक पॅनलच्या मनोमिलनाचे गुऱ्हाळ अखेर थांबले. त्यानंतर सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी ‘रयत’ची पाठराखण करत सहकार पॅनलला आव्हान दिले आहे. त्यामुळे इस्लामपूर परिसरासह बोरगाव-रेठरेहरणाक्ष गटातील ‘रयत’च्या उमेदवारांना ऊर्जा मिळाली आहे. आता अर्ज मागे घेतल्यानंतर लढतीचे चित्र निश्चित होईल. त्यानंतर प्रचाराला गती येणार आहे.
बोरगाव-रेठरेहरणाक्ष गटातील रेठरेहरणाक्ष गावाला नेहमी प्राधान्य मिळते. या गावात ८७३ मतदान आहे. पंधरा वर्षे ग्रामपंचायतीच्या कारभारात कार्यरत असलेले जे. डी. मोरे यांना ‘सहकार’ने उमेदवारी दिली आहे. याच गावातील दिलीप मोरे, अॅड. विवेकानंद मोरे यांना रयत पॅनलने उमेदवारी देऊन आव्हान उभे केले आहे. यातील दिलीप मोरे यांचे नाव निश्चित होण्याचे संकेत आहेत. संस्थापक पॅनलकडून या गावात केदार शिंदे यांचे नाव निश्चित होते. परंतु, पवार-मोरे यांच्यातील लढतीमुळे महेश पवार यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले. त्यातून संस्थापक पॅनलशी निष्ठावान असलेल्या शिंदे भावकीत नाराजीची चर्चा आहे. बोरगावातही अशीच परिस्थिती आहे. विद्यमान संचालक जितेंद्र पाटील यांना ‘सहकार’ची उमेदवारी निश्चित आहे. तेथे उदय शिंदे आणि मानाजी पाटील संस्थापक पॅनलकडून इच्छुक आहेत. माजी संचालक उदय शिंदे यांची उमेदवारी निश्चित आहे, तर रयत पॅनलकडून विश्वास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. येथे एकूण सभासद संख्या ८८८ आहे. जितेंद्र पाटील यांच्यापुढे संस्थापक पॅनलचे उदय शिंदे आव्हान उभे करतील, अशी चर्चा आहे.
इस्लामपुरात उमेदवारीबाबत संस्थापक पॅनलकडून घोडे अडले आहे. दिवंगत एम. डी. पवार यांच्या घरातील शिवाजी पवार यांचे नाव निश्चित झाले असल्याने त्यांचा प्रचार सुरू आहे. परंतु, गत निवडणुकीत उभे राहिलेले युवराज पाटील यांना पाऊल मागे घेण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यामुळे तेही नाराज असल्याची चर्चा आहे. रयत पॅनलकडून मात्र इस्लामपुरातून माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि कामेरीतून प्रा. अनिल पाटील यांना उमेदवारी दिल्याने या पॅनलची जमेची बाजू भक्कम होत चालल्याची चर्चा आहे. इस्लामपुरात ७५३, तर कामेरीमध्ये ७३६ सभासद आहेत.
बहे येथे सहकार पॅनलचे जयश्री पाटील, अविनाश खरात उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात रयत पॅनलकडून सुरेखा पाटील (शिरटे) व बहे येथून सावित्री पाटील उमेदवार आहेत. संस्थापक पॅनलकडून मीनाक्षी दमाने यांचे नाव चर्चेत आहे. या गटातील रयत आणि संस्थापक पॅनलकडून उमेदवारी निश्चित झालेली नाही. बोरगाव-रेठरेहरणाक्ष गटात सहकार पॅनल काॅंग्रेसचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रयत पॅनलसमोर आव्हान उभे करेल, अशी चर्चा आहे.
कोट
बोरगाव-रेठरेहरणाक्ष गटातील आमचे उमेदवार निश्चित आहेत. त्यांनी सभासदांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे. गेल्या पाच वर्षांतील ‘कृष्णे’चा कारभार स्वच्छ आहे. त्यामुळेच सभासदांना योग्य दर मिळाला आहे.
- डॉ. अतुल भोसले, सहकार पॅनल
कोट
प्रारंभीच्या टप्प्यात वाळवा तालुक्यात कमी पडतो की काय, असे चित्र होते. परंतु, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या भूमिकेमुळे कडेगाव तालुका आणि वाळवा तालुक्यात रयत पॅनल भक्कम होत चालल्याचे दिसत आहे.
- डॉ. इंद्रजित मोहिते, रयत पॅनल