इस्लामपुरातील गाळे धूळ खात
By admin | Published: November 13, 2015 11:13 PM2015-11-13T23:13:22+5:302015-11-13T23:50:33+5:30
नगरपरिषदेचे व्यापारी संकुल : कोट्यवधींची गुंतवणूक वाऱ्यावर
युनूस शेख - इस्लामपूर नगरपालिकेच्या विकास कामांचा ढिसाळपणा स्पष्ट होऊ लागला आहे. शाश्वत विकासाच्या गप्पा मारताना अशाश्वत आणि निकृष्ट दर्जाची कामे करणे, असे नवीन समीकरण समोर येत आहे. जुनी विकासकामे माना टाकत असताना, नवीन विकासकामे वापराविना धूळ खात आहेत. तेथे मद्यपी आणि धूम्रपानाचे अड्डे तयार झाले आहेत.
शहरातील काळा मारुती मंदिराच्या पूर्वेस दुमजली व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. निविदा प्रक्रिया बांधकाम आणि दोन वर्षांनी १७ जानेवारी २०१५ ला उद्घाटन, असा प्रवास केलेली ही देखणी इमारत उद्घाटनानंतरही दहा महिने शोभेच्या बाहुलीसारखी उभी आहे. शहरातील युवकांना स्वयंरोजगार करता यावा आणि पालिकेच्या उत्पन्नात भर पडावी, या हेतूने हे व्यापारी संकुल तयार झाले. मात्र त्याचा फायदा व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांना होतच नाही, शिवाय पालिकेलाही नाही.
एका बाजूला प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसताना, हे व्यापारी संकुल वापरात आणण्याचीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संकुलाचा लाभ कुणालाही मिळालेला नाही. कोट्यवधीची गुंतवणूक धूळ खात पडली आहे. शहरातील विकास कामांचा बोऱ्या उडाला आहे. जलतरण तलाव पूर्णपणे फोडून तेथे नवीन काम सुरू आहे. पूर्वीचे ४०-५० लाख पाण्यात गेले. आता नव्या कामासाठी ७० लाख धरण्यात आले आहेत. पाण्यासारख्या वाया गेलेल्या पैशाचे काय? याला उत्तर नाही. प्रशासनाची गती मंदावली आहे. पदाधिकाऱ्यांची अवस्था त्यापेक्षा वेगळी नाही.
मती आणि गती मंदावली तर अधोगती होते, हा निसर्गनियम आहे. प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी गती वाढवून विकास कामांचा लाभ नागरिकांना द्यावा, अशी अपेक्षा आहे.
आधी काम : मग टेंडर!
व्यापारी संकुलाच्या उभारणीपासूनच हे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ‘आधी काम नंतर टेंडर’ ही इथली जुनी पद्धत या कोट्यवधीच्या व्यापारी संकुल उभारणीसाठी वापरात आली. त्याविरुद्ध येथील कॉँग्रेसचे कार्यकर्ते विजय पवार, स्वाभिमानीचे महेश पाटील, अनिल नरळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब टाकण्यात येत असताना ई-निविदा नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कारवाई झाली नाही.
खासदारांच्या पत्रासही वाटाण्याच्या अक्षता
जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेबाबत विभागीय आयुक्त, खासदार राजू शेट्टी यांच्याकडे तक्रारी झाल्या. खासदार शेट्टी यांनी नगरविभाग अखत्यारित असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र धाडून कारवाईची मागणी केली. त्यालाही वाटाण्याचा अक्षता लागल्या.