इस्लामपूर, शिराळ्यात आनंदोत्सव !
By admin | Published: July 5, 2015 01:18 AM2015-07-05T01:18:52+5:302015-07-05T01:19:15+5:30
यूपीएससी परीक्षा : सुमित गरुड, प्रवीण नलवडे यांचे चमकदार यश
इस्लामपूर/शिराळा : इस्लामपुरातील सुमित सुनील गरुड आणि शिराळ्यातील प्रवीण सुरेश नलवडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सांगली जिल्ह्याचा झेंडा फडकावला. सुमित गरुडने नागरी सेवा परीक्षेत देशात १६९ वा क्रमांक, तर प्रवीण नलवडे याने देशात ६४९ वा क्रमांक मिळवला. सुमितची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली आहे.
इस्लामपूरच्या महादेवनगर परिसरातील सुमित शहरातून देशपातळीवरील परीक्षेत यश मिळविणारा पहिला विद्यार्थी ठरला. येथील आदर्श बालक मंदिरमध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेताना त्याने चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सहावा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर सातवी शिष्यवृत्तीतही तो राज्यात सहावा आला. दहावीच्या परीक्षेत ९५.०६ टक्के गुण मिळवत कोल्हापूर विभागात २००३ मध्ये पहिला येण्याचा बहुमान त्याने पटकावला. २००५ ला बारावीच्या परीक्षेत विभागात सहावा आला. त्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून घेतले. मुंबई (परेल) येथील जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी मिळवितानाच त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी चालविली होती. त्यासाठी त्याने दिल्ली येथील स्पर्धा परीक्षा केंद्रात अभ्यास सुरू केला. लागोपाठच्या तिसऱ्या प्रयत्नात त्याने देशात १६९ वा क्रमांक पटकावला. सुमित सध्या नागपूर येथील वनावती शासकीय प्रशिक्षण केंद्रात सहायक गटविकास अधिकारी पदाचे प्रशिक्षण घेत आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून त्याची निवड झाली होती. पाटबंधारे विभागातील अभियंता सुनील गरुड यांचा तो मुलगा आहे. त्याचा भाऊ संकेत हैदराबाद येथे भारतीय पेट्रोलियम कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे. (वार्ताहर)
कापसाच्या निकृ ष्ट बियाण्यांचा २० कोटींचा फटका
बियाणे अनुवंशकीय अशुध्द : शेतकऱ्यांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाल्याचा राहुरी कृषी विद्यापीठाचा अहवाल
अविनाश बाड ल्ल आटपाडी
आटपाडी तालुक्यात यंदा उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी लागवड केलेले कृषीधन सीडस् प्रा. लि. जालना या बियाणे उत्पादक कंपनीचे सुपर फायबर बी. जी. (के.डी.सी.जी.बी) ४०७ या वाणाचे बियाणे अनुवंशकीय अशुध्द असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अधीर आहेर आणि डॉ. नीलेश पवार यांनी दिला आहे. कंपनीने तालुक्यातील एक हजारहून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरावरून २० कोटी फटक्याचा नांगर फिरविला आहे.
यंदा लागवड केलेल्या दोन कंपन्यांच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. कृषीधन कंपनीच्या बियाण्यांची तालुक्यातील ९० टक्के शेतकऱ्यांनी लागवड केली. त्याच कंपनीचे बियाणे बोगस असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तर ग्रीन गोल्ड सीडस् प्रा. लि., औरंगाबाद या कंपनीचे कविता गोल्ड बी. जी. ११ या वाणाच्या कापसामध्ये ४० टक्के आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव शास्त्रज्ञांना आढळून आला आहे. त्यामुळे या कापूस पिकामध्ये ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कृषी शास्त्रज्ञांच्या अहवालामुळे आता आटपाडी तालुक्यात उन्हाळ्यात यंदा तापमानात वाढ झाल्यामुळे कापसाचे नुकसान झाल्याचा कंपनी आणि विक्रेत्यांचा दावा खोटा ठरला आहे. शेतकऱ्यांनी कापसासाठी केलेली सगळी मेहनत वाया गेली आहे.
आटपाडी तालुका तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष आणि उपविभागीय कृषी अधिकारी जे. जी. कवडे यांनी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांना कृषी शास्त्रज्ञांच्या अहवालासह आतापर्यंत उपलब्ध झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचा अहवाल सादर केला आहे. पुण्याच्या कृषी आयुक्तालयाचे संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण), कोल्हापूर विभागाचे कृषी सहसंचालक आणि सांगलीचे कृषी जिल्हा अधीक्षक यांनाही त्यांनी अहवाल सादर केला आहे.
शेतकऱ्यांनी तक्रारी द्याव्यात
शेतकऱ्यांनी बोगस बियाण्यांबाबत तक्रारी केल्यापासून कृषी विभागाने वारंवार कारवाईस विलंब लावल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. आता शास्त्रज्ञांचा अहवाल प्राप्त होताच आजच (जा.क्र. ३ वि कृ अ/ तंत्र-१ / कापूस तक्रार/१८३९/२०१५) तातडीने वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे. पण काही गावपातळीवरील कर्मचारी शेतकऱ्यांना काही मिळणार नाही, असे सांगत आहेत. ग्राहक न्यायालयाने २००८ च्या बोगस कापूस बियाण्यांबाबत नुकसानभरपाई मागणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी ५१ हजार रुपये देण्याचा कंपनीला आदेश दिला आहे. त्यामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे तक्रार देण्याची गरज आहे.