इस्लामपूर शहराला केंद्र शासनाकडून ‘ओडीएफ प्लस प्लस’ मानांकन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 05:05 PM2022-07-23T17:05:20+5:302022-07-23T17:06:04+5:30
या मानांकनामुळे पालिकेला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार
इस्लामपूर : केंद्र शासनाच्या वतीने शहरातील सार्वजनिक स्वच्छतेच्या कामाची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये शहराला ओडीएफ प्लस प्लस हे मानांकन दिले आहे. पालिकेने सलग तिसऱ्या वर्षी हे मानांकन मिळविण्यात सातत्य ठेवल्याचे मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी सांगितले.
यावर्षीच्या फेब्रुवारी, मार्च महिन्यात केंद्र शासनाकडून आलेल्या समितीने या स्वच्छतेच्या कामाची गोपनीय तपासणी केली होती. जिल्ह्यातील इतर पालिकांपेक्षा सरस कामगिरी नोंदवत इस्लामपूर शहराने या स्पर्धेत बाजी मारली. या मानांकनामुळे पालिकेला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. त्यातील ६० लाख रुपये मिळालेले आहेत. यावर्षीच्या मानांकनामुळे राहिलेले ४० लाख रुपये लवकरच मिळतील. हा निधी शहरातील मूलभूत सुविधांसाठी खर्च केला जातो.
केंद्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर या निकालाची घोषणा करण्यात आली. हे यश मिळविण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या पालिकेच्या पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे साबळे यांनी अभिनंदन केले.