इस्लामपुरात काँग्रेसचा चार प्रभागांवर दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:42 AM2020-12-15T04:42:02+5:302020-12-15T04:42:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत आघाडी झाली, तर काँग्रेस चार प्रभागांवर दावा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत आघाडी झाली, तर काँग्रेस चार प्रभागांवर दावा करणार असल्याचे काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस तथा प्रभारी जिल्हाध्यक्षा मनीषा रोटे यांनी सांगितले. शिवसेनेबरोबर आता काँग्रेसही सामील झाल्यास जागा वाटप करताना राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे ठाकणार आहे.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रित येऊन आघाडीच्या माध्यमातून १५ वर्षे सत्ता सांभाळली. या कालावधित राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील मंत्री होते, परंतु त्यांनी इस्लामपूर मतदारसंघात काँग्रेससोबत कधीच तडजोड केली नाही. आता राज्यात महाआघाडीची सत्ता आहे, तरीही काँग्रेसला विचारात घेतले जात नाही. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील आणि इतर पदाधिकारी जयंत पाटील यांच्यापासून अंतर राखून आहेत. पालिकेत काँग्रेसचे नगरसेवक वैभव पवार राष्ट्रवादीच्या विरोधात आहेत.
दुसरीकडे मनीषा रोटे यांनी महिला संघटनेच्या माध्यमातून राजकारणात ‘एन्ट्री’ केली. मात्र इस्लामपूरच्या राजकारणात त्यांना रस नाही. त्यांनी वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणी करून महिला आघाडीचे राज्य पातळीवरील सरचिटणीसपद मिळवले. जयंत पाटील यांनीही महाआघाडीचा धर्म पाळत विविध कार्यक्रमांमध्ये रोटे यांना निमंत्रणासह मानाचे स्थान दिले. आता रोटे काँग्रेसमध्ये सक्रिय होऊन इस्लामपुरात पक्षाची ताकद वाढविण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु त्यामध्ये अडचणी येत आहेत.
कोट
नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेची युती झाली, तर कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विचाराने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे काँग्रेसच्यावतीने चार प्रभागांत उमेदवारी देण्याविषयी प्रस्ताव ठेवणार आहोत. त्यांच्या धोरणानुसार पालिका निवडणुकीत सक्रिय होऊ. काँग्रेसमधून कोण इच्छुक आहेत, याची चाचपणी केलेली नाही.
- मनीषा रोटे, महिला आघाडीच्या प्रभारी जिल्हाध्यक्षा
फोटो- १४मनीषा रोटे