Sangli: एसटी बस उशिरा आली, अधिकाऱ्यांशी वादावादी घालत प्रवाशाकडून तिकीटास नकार; गुन्हा दाखल
By शीतल पाटील | Published: November 21, 2023 07:00 PM2023-11-21T19:00:13+5:302023-11-21T19:01:38+5:30
शिराळा : शिराळा आगाराची इस्लामपूर-ढाणकेवाडी एसटी बस इस्लामपूर येथील प्लॅटफॉर्मवर लागली. प्रवाशीही बसले. मात्र एक प्रवाशाने या बसला दहा ...
शिराळा : शिराळा आगाराची इस्लामपूर-ढाणकेवाडी एसटी बस इस्लामपूर येथील प्लॅटफॉर्मवर लागली. प्रवाशीही बसले. मात्र एक प्रवाशाने या बसला दहा मिनिटे उशीर का झाला, मी तिकीट काढणार नाही, असा पवित्रा घेतला. अखेर या प्रवाश्याविरोधात एसटीच्या अधिकाऱ्यांनी शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
ही बस ( क्रमांक एम एच ०६ एस ८२०२) इस्लामपूर हुन ढाणकेवाडी ला जाणार होती. सध्या पुणे मुंबई मार्गावर जादा प्रवाशी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे काही गाड्या उशिरा सुटत आहेत. सायंकाळी सव्वा सातची ही बस साडेसातच्या दरम्यान सुटली. या बसमधील एका प्रवाशाने बसला का उशीर झाला, मी तिकीट काढणार नाही, असा पवित्रा घेतला. वाहक, चालकांनी समजावून सांगितले. यानंतर बस चेकर आले त्यांनीही प्रवाश्यांची तिकीट तपासणी करताना त्यांनाही समजावले. मात्र त्यांनाही दाद दिली नाही.
अखेर ही बसरात्री आठ वाजता शिराळा पोलीस ठाण्यात आणली. यावेळी पोलिसांनीही समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवाशाने अजिबात दाद दिली नाही. इतर प्रवाशांसाठी दुसऱ्या बसची सोय करण्याची वेळ महामंडळावर आली. दुसरी बस आल्यावर हा प्रवाशीही झटकन त्यात बसला. रात्री सव्वा नऊ वाजता दुसरी बस प्रवाशी घेऊन रवाना झाली. यानंतर आगार प्रमुख संजय चव्हाण यांनी या प्रवाश्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. दरम्यान संबंधित प्रवाशी सतत वाहक- चालकांना त्रास देत असतो, अशीही चर्चा बसस्थानकात होती.