इस्लामपूरची कन्या करणार ‘आर्मी परेड डे’चे संचालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:19 AM2021-01-01T04:19:01+5:302021-01-01T04:19:01+5:30
इस्लामपूर : सध्या उत्तर प्रदेशातील मथुरा येथील लष्करी तळावर कार्यरत असणाऱ्या कॅप्टन रुचिका प्रकाश पाटील १५ जानेवारीरोजी दिल्लीत होणाऱ्या ...
इस्लामपूर : सध्या उत्तर प्रदेशातील मथुरा येथील लष्करी तळावर कार्यरत असणाऱ्या कॅप्टन रुचिका प्रकाश पाटील १५ जानेवारीरोजी दिल्लीत होणाऱ्या ७२ व्या लष्करी दिनाचे संचालन करणार आहेत.
लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात भारतीय लष्कराच्या शौर्यगाथेच्या देदिप्यमान परंपरेचे देशवासीयांना दर्शन घडविले जाते. त्यासाठी इस्लामपूूरची सुकन्या असणाऱ्या कॅप्टन रुचिका पाटील यांची निवड प्रेरणादायी ठरली आहे.
१५ जानेवारी १९४९ रोजी जनरल के. एम. करिअप्पा यांनी देशाच्या लष्कराचे पहिले प्रमुख म्हणून सूत्रे हातात घेतली. ब्रिटिश अधिकारी कमांडर फ्रान्सिस बुचर देशाचे शेवटचे लष्करी अधिकारी ठरले. तेव्हापासून गेली ७२ वर्षे १५ जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो. याविषयी दिल्लीच्या कॅन्टोनमेंट परिसरातील करिअप्पा परेड मैदानावर लष्करातील सर्व विभागाचे संचलन केले जाते. या परेडमध्ये देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांना मानवंदना दिली जाते. या आर्मी परेड डेमध्ये परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र हे सर्वोच्च पुरस्कार वगळता शौर्यपदक, सेनापदक, वीरचक्र व इतर पुरस्कारांनी देशाच्या संरक्षणासाठी अतुलनीय कामगिरी केलेल्या सैनिकांचा व अधिकाऱ्यांचा लष्करप्रमुखांच्याहस्ते गौरव केला जातो. परमवीर चक्र, महावीर चक्र, अशोक चक्र हे सर्वोच्च पुरस्कार २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात राष्ट्रपतींच्याहस्ते वितरित केले जातात.
चाैकट
उत्कृष्ट कामगिरी
कॅप्टन रुचिका या निवृत्त कर्नल प्रकाश शंकरराव पाटील यांच्या कन्या, तर डॉ. विश्वास पाटील-खेडकर यांच्या पुतणी आहेत. कॅप्टन रुचिका यांनी लष्करी सेवेतील सर्वांत खडतर प्रशिक्षण देणाऱ्या चेन्नईच्या यंग ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीमधील गुणवत्तेच्या जोरावर सप्टेंबर २०१४ मध्ये लष्करी सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर अवघ्या अडीच वर्षांत त्यांनी कॅप्टन पदावर मोहोर उमटवली. त्यांनी आतापर्यंत राजस्थान, जम्मू-काश्मीरच्या संवेदनशील सीमावर्ती भागात काम करत पुणे आणि सध्या मथुरा येथे लष्करी सेवेत त्या कार्यरत आहेत.
फोटो -३११२२०२०-आयएसएलएम-रुचिका पाटील