इस्लामपूर बाजार समितीची हवा थंड!
By admin | Published: June 29, 2015 11:41 PM2015-06-29T23:41:58+5:302015-06-30T00:15:34+5:30
संचालक पदासाठी फिल्डिंग : जयंत पाटील यांना साकडे; विरोधी गट मात्र शांतच
अशोक पाटील - इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३० जुलैरोजी होत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतून ५८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील ५६ अर्ज वैध ठरले आहेत. संचालकपद मिळण्यासाठी उमेदवार माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांना भेटून साकडे घालत आहेत. परंतु जयंत पाटील हे मात्र, ‘अजून बराच कालावधी आहे, बघूया परत’, असे उत्तर देत आहेत. विरोधी गटाकडूनही ठोस असा विरोध होत नसल्याने निवडणुकीची हवा थंडच आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत जयंत पाटील यांचे समर्थक मोठ्या ताकदीनिशी उतरले आहेत. यातील ५६ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर त्यांच्याविरोधात नानासाहेब महाडिक समर्थक, काँग्रेस आणि शिवसेनेने आपले उमेदवार दिले आहेत.
तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी विरोधक एकत्र येण्याची भाषा करत असले तरी, नेतृत्व कोणाकडे द्यायचे, हा प्रश्न आहे.
राष्ट्रवादीच्यावतीने उमेदवारी मिळावी, यासाठी उमेदवार आपले कार्यकर्ते घेऊन आमदार जयंत पाटील यांची भेट घेऊन साकडे घालताना दिसत आहेत. परंतु उमेदवार ठरविण्याची अंतिम तारीख १४ जुलै असल्याने जयंत पाटील यांनी अद्यापही या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले नाही. अजून वेळ आहे, बघू, अशीच उत्तरे भेटणाऱ्या उमेदवारांना ते देत आहेत.
काँग्रेससह पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या महाडिक गटानेही वेगळे अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेचे आनंदराव पवार यांच्याही समर्थकांनी अर्ज दाखल करुन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक भाजप नेते मात्र या निवडणुकीपासून दूर राहिले आहेत, तर पवार पार्टीचे वैभव पवार आणि त्यांचे बंधू विजय पवार यांनी राष्ट्रवादीला ‘टार्गेट’ करून त्यांच्या उमेदवारांविरोधात तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे.
निवडणुकीतील चित्र स्पष्ट होण्यासाठी १४ जुलैची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी निवडणुकीची हवा थंड असल्याचेच चित्र आहे.