इस्लामपुरात विरोधकांचे मनोबल ढासळतंय!

By admin | Published: June 7, 2016 10:55 PM2016-06-07T22:55:01+5:302016-06-08T00:14:41+5:30

नगरपालिका परिसर : ऊस उत्पादकांच्या आर्थिक नाड्या जयंतरावांच्या हातात

In Islampur, the morale of opponents is deteriorating! | इस्लामपुरात विरोधकांचे मनोबल ढासळतंय!

इस्लामपुरात विरोधकांचे मनोबल ढासळतंय!

Next

अशोक पाटील--इस्लामपूर --गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ इस्लामपूर नगरपालिकेवर जयंत पाटील आणि त्यांच्या समर्थकांची सत्ता आहे. उरुण परिसरासह शहरात ऊस उत्पादक मतदारांची संख्या मोठी आहे. हे ऊस उत्पादक ऊस दरासाठी लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांच्या पाठीशी राहतात. मात्र त्यांच्या आर्थिक नाड्या साखर सम्राटांचे नेते जयंत पाटील यांच्या हातात आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या विरोधकांना मंत्रीपद, खासदारकी, आमदारकी मिळूनही ते पाटील यांच्याविरोधात ताकद वाढवू शकलेले नाहीत.
आगामी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीतून पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, अ‍ॅड. चिमण डांगे, सौ. अरुणादेवी पाटील, सौ. शारदा पाटील, बी. ए. पाटील, उपनगराध्यक्ष संजय कोरे, खंडेराव जाधव, पीरअली पुणेकर, सौ. मनीषा पाटील, कविता पाटील आदी तगडे पदाधिकारी ताकद अजमावणार आहेत. त्या सर्वांचीच आर्थिक ताकत मोठी आहे.
विरोधी गटातील महाडिक युवा शक्तीचे कपिल ओसवाल, सतीश महाडिक, जलाल मुल्ला, सोमनाथ फल्ले, चेतन शिंदे, भाजपचे विक्रम पाटील, बाबा सूर्यवंशी, विजय कुंभार, कॉँग्रेसचे वैभव पवार यांनाही पालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. परंतु सत्ताधाऱ्यांच्या आर्थिक ताकतीपुढे हे विरोधक कमी पडणार आहेत. विरोधकांच्या पाठीशी खासदार राजू शेट्टी, आ. शिवाजीराव नाईक आणि आता नव्याने आमदार झालेले सदाभाऊ खोत यांच्यासह नानासाहेब महाडिक यांची ताकत असली तरी, आजही विरोधकांत ताळमेळ नाही. परिणामी विरोधी गटातील कार्यकर्त्यांचे मनोबल ढासळत चालले आहे.
माजी मंत्री अण्णासाहेब डांगे विरोधी गटात असताना त्यांनी पालिकेच्या सभागृहात ताकद दाखविली होती. त्यांच्या पाठीशी महाडिक गटासह जयंत पाटील यांच्याविरोधात कार्यरत असलेले सर्व नेते होते. मागील निवडणुकीपासून डांगे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. त्यामुळे पालिकेच्या सभागृहात विरोधकांची ताकद कमी पडत चालली आहे. आगामी निवडणुकीसाठी अद्याप विरोधक एकत्र आलेले नाहीत.
आता सदाभाऊ खोत आमदार झाले, मंत्रीही होतील. त्यामुळे विरोधकांना एकत्र करण्यात ते यशस्वी होणार, अशी चर्चा आहे. परंतु विरोधी गटात चारचौघांचे नेतृत्व करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. ते स्वत:ला नेते समजू लागले आहेत. त्यामुळेच कार्यकर्त्यांचे मनोबल ढासळत चालले आहे. यावर आता खासदार शेट्टी व आमदार खोत कोणते ‘टॉनिक’ देतात, याकडे परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: In Islampur, the morale of opponents is deteriorating!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.