इस्लामपूर पालिकेत नगराध्यक्षांकडून नियम धाब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:25 AM2021-03-19T04:25:45+5:302021-03-19T04:25:45+5:30
इस्लामपूर : नगरपालिकेच्या सभागृहातील कामकाजामध्ये नगराध्यक्ष निशिकांत पाटील अधिनियमांचा भंग करून कामकाज बेकायदेशीरपणे चालवितात. तसेच राष्ट्रवादी आणि अपक्ष ...
इस्लामपूर : नगरपालिकेच्या सभागृहातील कामकाजामध्ये नगराध्यक्ष निशिकांत पाटील अधिनियमांचा भंग करून कामकाज बेकायदेशीरपणे चालवितात. तसेच राष्ट्रवादी आणि अपक्ष आघाडीच्या नगरसेवकांच्या कायदेशीर हक्क, अधिकारास बाधा पोेहोचवली जात असल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या तक्रारीचे निवेदन नगरसेवक शहाजी पाटील, विश्वनाथ डांगे आणि खंडेराव जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेत तीन दिवसांच्या आत या तक्रारीसंदर्भात मुख्याधिकाऱ्यांचे म्हणणे घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सभागृहात राष्ट्रवादी व अपक्ष आघाडीचे १५ नगरसेवकांसह पूर्ण बहुमत आहे. मात्र, तरी सुद्धा नगराध्यक्ष पाटील अधिनियमाचे उल्लंघन करून कामकाज करतात. इतिवृत्ताच्या साक्षांकित प्रती हेतुपुरस्सर दिल्या जात नाहीत. इतिवृत्तावर पीठासीन प्राधिकाऱ्याने सही केली पाहिजे, अशी स्पष्ट तरतूद असताना त्याच्यावर सही केली जात नाही. याबाबत वारंवार तक्रार करूनही कामकाजामध्ये सुधारणा झालेली नाही. पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी हेसुद्धा त्यांचे अधिकार व कर्तव्य बजावण्यास टाळाटाळ करीत असल्याचे म्हटले आहे. इतिवृत्ताची मागणी करूनही ते पीठासीन अधिकाऱ्यांची सही नसल्याचे कारण सांगत देण्यास टाळाटाळ केली जाते. विकासकामांच्या विषयांना बगल देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे या कामासाठी मंजूर असलेला निधी शासनाकडे परत जाण्याची दाट शक्यता आहे. त्यातून शहरातील नागरिकांना प्राप्त होणाऱ्या सोयीसुविधांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न दिसून येतो. अशा तक्रारी निवेदनात करण्यात आल्या आहेत.