Sangli- काळाचा घाला,..अन् अवघ्या पंधरा दिवसांत संसार कायमचा संपला; नवविवाहित दाम्पत्य अपघातात ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 01:20 PM2023-04-03T13:20:43+5:302023-04-03T13:28:19+5:30
आयुष्यभराची साथ देण्याचे वचन दिलेले. संसार काय असतो हे समजले पण नाही. हळद उतरली नाही तोच...
इस्लामपूर : कर्नाटकातील हल्लूर (ता. मुदलगी, जि. बेळगाव) येथे टँकर व कारच्या अपघातात इस्लामपुरातील नवदाम्पत्य ठार झाले. बदामीतील बनशंकरी देवीचे दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात घडला.
इंद्रजित मोहन ढमणगे (वय २८) व कल्याणी ढमणगे (वय २६, दोघेही रा. किसाननगर इस्लामपूर, ता. वाळवा), अशी मृतांची नावे आहेत. अपघातात इंद्रजित यांचे वडील मोहन व आई गंगव्वा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
इस्लामपूर येथील अभियंता इंद्रजित मोहन ढमणगे यांचा विवाह इचलकरंजी येथील प्रकाश उरणे यांची कन्या ॲड. कल्याणी यांच्याशी १८ मार्चला झाला होता. नवविवाहित जोडपे चारचाकीमधून शुक्रवारी ३१ मार्चला सकाळी इस्लामपूर येथून कर्नाटकातील बनशंकरी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. मृत इंद्रजित यांचे आई- वडीलही सोबत होते.
शनिवारी ढमणगे कुटुंबाने देवीचे दर्शन घेतले. तेथून घरी परत येताना हल्लूर गावाजवळ एका टँकरने त्यांच्या कारला जोरात धडक दिली. त्यात इंद्रजित आणि कल्याणी हे दाम्पत्य ठार झाले. इंद्रजितचे आई- वडील जखमी झाले. त्यांना इस्लामपुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अवघ्या पंधरा दिवसांत संसार उद्ध्वस्त
अपघातामुळे ढमणगे व उरणे कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसला आहे. लग्नानंतर अवघ्या पंधराव्या दिवशी नवदाम्पत्याचा संसार उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. इस्लामपुरातील किसाननगर येथे व ढमणगे यांच्या मूळ घराच्या उरूण परिसरात शोककळा पसरली. मृत इंद्रजित हा मुंबईत एका कंपनीत संगणक अभियंता होता.
बहिणीचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा
एकुलता एक मुलगा गेल्याने ढमणगे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. रविवारी सकाळी मृतदेह आणल्यावर बहिणीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. रविवारी सकाळी दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.