Sangli: गृहप्रवेशाच्या खर्चाची रक्कम अंधश्रद्धा निर्मूलनास, महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून गृहप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 11:59 AM2023-12-18T11:59:45+5:302023-12-18T11:59:45+5:30
इस्लामपूर : इस्लामपूर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा इस्लामपूरचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. शंकर माने यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कलाविष्कार ...
इस्लामपूर : इस्लामपूर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा इस्लामपूरचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. शंकर माने यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कलाविष्कार या नवीन वास्तूच्या गृहप्रवेशावेळी सत्यनारायण पूजा, होमहवन, शांती अशा सर्व कर्मकांडाला फाटा देत महापुरुषांचे स्मरण आणि त्यांच्या पुतळ्यांचे पूजन करून अनोख्या पद्धतीने गृहप्रवेश केला.
या सर्व प्रकारच्या कर्मकांडासाठी खर्च होणारी रक्कम १० हजार रुपये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला देणगी स्वरूपात समितीच्या राज्य अध्यक्षा सरोज पाटील (माई) यांच्याकडे सुपुर्द केली. क्रांतिसिंह नाना पाटीलनगरमध्ये माने यांनी आपले घर बांधताना सुरुवातीपासूनच कोणत्याही स्वरूपाचे वास्तुशास्त्र न मानता स्वत:च्या गरजेप्रमाणे घराची रचना केली.
संपूर्ण बांधकामावेळीही कोणत्याही पद्धतीचे कर्मकांड केले नाही. त्यांच्या या निर्णयामुळे इंजिनिअरला घराचे बांधकाम करणे खूपच सोपे झाले. विशेष म्हणजे घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिणमुखी आहे. घरासाठी कूपनलिका पाडतानासुद्धा त्यांनी कोणत्याही पानाड्याला न बोलावता आपल्या सोयीप्रमाणे उपलब्ध जागेत कूपनलिका पाडली.
गृहप्रवेशासाठी कोणताही मुहूर्त न पाहता, होमहवन, सत्यनारायण पूजा न करता पुरोहितांना न बोलाविता विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन करून गृहप्रवेश केला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्षा सरोज पाटील (माई), महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड एन. आर. पाटील, सुनील पाटील, अंनिसचे जिल्हाध्यक्ष व्ही. वाय. पाटील, कार्याध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव, प्राचार्य विश्वास सायनाकर, राजारामबापू कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील, ॲड. सुभाष पाटील, बी. ए. पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील, सरपंच आनंदराव अदाटे, नगरसेवक संग्राम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांना महापुरुषांच्या विचारांची पुस्तके आणि प्रतिमा भेट देण्यात आली.