इस्लामपुरात पोलिसांसमोरच फिजिकल डिस्टन्सिंगचा वाजतोय बोऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:26 AM2021-04-21T04:26:13+5:302021-04-21T04:26:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : ‘विनामास्क पकडा, रॅपिड अँटिजेन चाचणी करा किंवा विविध कलमाखाली गुन्हे दाखल करा. आम्ही घाबरणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : ‘विनामास्क पकडा, रॅपिड अँटिजेन चाचणी करा किंवा विविध कलमाखाली गुन्हे दाखल करा. आम्ही घाबरणार नाही!’ असेच जणू सध्या इस्लामपूरकर सांगत आहेत. कारवाईसाठी चौकाचौकात पोलिसांचा फौजफाटा आहे, तर तेथून पुुढे शंभर मीटरवर भाजीपाल्यासाठी तोबा गर्दी आहे. पोलिसांसमोरच फिजिकल डिस्टन्सिंगचा बोऱ्या वाजत आहे.
इस्लामपूर आणि परिसरात दररोज दोनशेच्या घरात कोरोना रुग्णांची संख्या गेली आहे. यावर कडक उपाय म्हणून महसूल, नगरपालिका आणि आरोग्य खात्याने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटिजेन चाचणीस सुरुवात केली आहे. यामध्ये तीन ते चार टक्के रुग्ण पॉझिटिव्ह सापडत आहेत. तरीसुद्धा नागरिक खुलेआम रस्त्यावर फिरताना दिसतात.
शहरातील वेगवेगळ्या चौकात पोलिसांचा फौजफाटा असूनही दुचाकीस्वार पोलिसांना जुमानत नाही. बऱ्याच ठिकाणी वाद घातले जातात. जुन्या बहे नाका चौकात २० ते २५ पोलीस, होमगार्ड आणि वाहतूक पोलिसांचा फौजफाटा असूनही रस्त्यावरची रहदारी कमी झालेली नाही. येथूनच शंभर मीटरवर भाजीपाला विक्रेते बसतात. तेथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. रस्त्यावरच करण्यात आलेल्या चाचणीमध्ये निगेटिव्ह आलेले नागरिक पुन्हा रस्त्यावर खुलेआम फिरू लागले आहेत. सध्या पोलीस ज्या चौकात असतात, तेथे गर्दी नसते. परंतु जवळच्या इतर चौकात मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून येत आहे.
चौकट
शिक्षा का नाही?
विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच रॅपिड अँटिजेन चाचणी घेतली जात आहे. पॉझिटिव्ह येणाऱ्यांना कोविड केंद्रावर दाखल करण्यात येते. परंतु विनाकारण हिंडणाऱ्या आणि निगेटिव्ह आलेल्या नागरिकांना इतर शिक्षा का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.