इस्लामपूरचा विकास म्हणजे लांडगा आला रे आला!

By admin | Published: October 18, 2015 11:02 PM2015-10-18T23:02:52+5:302015-10-18T23:30:54+5:30

विजय कुंभार : पालिकेतील सत्ताधाऱ्यांची पोकळ घोषणा, शहरवासीयांची केली फसवणूक

Islampura's development is the wolf came! | इस्लामपूरचा विकास म्हणजे लांडगा आला रे आला!

इस्लामपूरचा विकास म्हणजे लांडगा आला रे आला!

Next

अशोक पाटील -- इस्लामपूर--माजी ग्रामविकास मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूरची बारामती करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी राज्य व केंद्राकडून निधीही उपलब्ध करून दिला आहे. परंतु या पैशातून इस्लामपूरची बारामती तर झालीच नाही. उलट सत्ताधाऱ्यांनी खोट्या घोषणा करून ‘लांडगा आला रे आला’ याप्रमाणे शहरवासीयांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.कुंभार म्हणाले, नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीवेळी सत्ताधारी राष्ट्रवादीला दिव्य स्वप्ने पडू लागतात. आघाडी शासनाच्या काळात जयंत पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाकडून शहर विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या रकमेतून झालेला विकास शहरवासीयांच्या नजरेपलीकडे गेलेला आहे. जो विकास झाला आहे, त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे, तर काही विकासाच्या योजना अर्धवट आहेत. काही कागदावरच वर्षानुवर्षे आहेत. कोट तलाव सुशोभिकरण, व्हेजिटेबल मार्केट, डिजिटल लायब्ररी, ट्रॅफिक सिग्नल, २४ तास पाणी, अद्ययावत रस्ते, आयुर्वेदिक बगीचे या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या घोषणेपैकी एकही काम झाले नाही. त्यामुळे त्यांच्या घोषणा या ‘लांडगा आला रे आला’ या वाक्यप्रचाराला तंतोतंत जुळणाऱ्या आहेत.गेल्या चार वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी केंद्र शासनाकडून भुयारी गटार योजनेसाठी ७० कोटी अनुदान मंजूर झाल्याची घोषणा केली होती. परंतु ही योजना बंद की चालू यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगला होता. ही योजना रद्द झाल्याची घोषणा भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील यांनी केली होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची ही घोषणाही पोकळच ठरली होती. योजना हवेत विरणार असल्याचे दिसताच सत्ताधारी राष्ट्रवादीने जयंतरावांकडे धाव घेऊन योजनेचा प्रस्ताव दिला. त्यासाठी रस्ते अनुदानाचे २३ कोटी रुपये बेकायदेशीरपणे वर्ग करून रस्ते प्रकल्प गुंडाळला. त्या २३ कोटींचे व्याज जवळजवळ कोटींच्या घरात गेले आहे. त्याचा हिशेबही सत्ताधाऱ्यांकडे नाही. याउलट भुयारी गटारीचा प्रकल्प तयार करण्यासाठी पुण्यातील एका कंपनीच्या नावे ५० लाख खर्ची टाकले. रस्ते विकास प्रकल्प तयार करण्यासाठी ५० लाख खर्च करून तोही प्रकल्प गुंडाळला आहे. हा खर्च शहरवासीयांच्या माथी कर रूपाने मारला जाणार असल्याचेही कुंभार म्हणाले.


तरच विश्वास बसेल..!
कुंभार म्हणाले, सध्या राज्यात, केंद्रात राष्ट्रवादीची सत्ता नाही. भुयारी गटारीसाठी राज्य शासनाकडून मिळणारे ७० कोटी रुपये हे फक्त मंजूर झाल्याच्या वल्गना होत आहेत. जेव्हा त्याचे अनुदान इस्लामपूर पालिकेच्या तिजोरीत पडेल तेव्हाच त्याच्यावर शहरवासीयांचा विश्वास बसेल.

Web Title: Islampura's development is the wolf came!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.