इस्लामपूरचा अर्थसंकल्प म्हणजे नुसती विकासाची कोल्हेकुई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2016 11:33 PM2016-02-29T23:33:13+5:302016-02-29T23:57:41+5:30
विजय कुंभार : सत्ताधाऱ्यांकडून विकास कामांचा नुसता फार्स
इस्लामपूर : इस्लामपूर शहराचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रवादीने २०१६-१७ चा सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे विकास कामाची कोल्हेकुई आहे. सभागृहात सादर केलेला १०७ कोटींचा अर्थसंकल्प म्हणजे सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. झालेला विकास आणि आगामी काळात होणारी विकासकामे याचा सत्ताधाऱ्यांनी नुसता फार्स केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना केला.
विजय कुंभार म्हणाले की, १९८५ पासून सत्ताधाऱ्यांनी फक्त कुसूमगंध बगीचा, राजारामबापू नाट्यगृह, बंद पडलेला पोहण्याचा तलाव, उद्ध्वस्त केलेले अंबिका उद्यान, तेथून गायब झालेली मिनी रेल्वे, तोट्यातील क्लब हाऊस, कोट तलावातील बोटिंग क्लब, निकृष्ट दर्जाची घरकुल योजना, गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेला गांडूळ खत प्रकल्प ही विकासकामे केली आहेत. यातील बहुतांशी प्रकल्प बंद आहेत. यावर कोट्यवधी रुपये केलेला खर्च पाण्यात गेला आहे.
सत्ताधारी सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांवर चर्चा न करता वाय-फायवर हाय-फाय चर्चा करतात. कोणतीही करवाढ केली नाही, असा डांगोरा पिटणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी दुसरीकडे मात्र नवीन मालमत्ताधारकांवर प्रचंड करवाढ लादली आहे. २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना कागदावरच राहिली असल्याचे अर्थसंकल्पात दिसते. शहराची एकूण पाणीपट्टी २ कोटी ८ लाख रुपये भरली जाते. एकूण पाणी पुरवठ्यावर होणारा खर्च १ कोटी ३६ लाख असून, पालिकेस ७२ लाख नफा होतो. मुंबईसारख्या मेट्रो शहरातही घरगुती एक हजार लिटर पाण्यासाठी ४.५० पैसे दर आहे. (वार्ताहर)
नागरिकांमध्ये नाराजी
पालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानावर अर्थसंकल्प फुगवला आहे. त्यामध्ये भुयारी गटारी ३० कोटी, घरकुल ११ कोटी अशा ४१ कोटी अनुदानाची मागणी शासनाकडे केली आहे. तसेच इस्लामपूर शहरातील रस्ते प्रकल्पासाठी शासनाने २४ कोटी ५८ लाख रुपये मंजूर केले आहेत. ते २ वर्षे बँकेत ठेवल्याने त्याचे ५ कोटींचे व्याज पालिकेने घेतले आहे. परंतु शहरातील रस्ते आणि भुयारी गटार योजना हे केवळ दिवास्वप्नच ठरले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे कुंभार यांनी स्पष्ट केले.