महापालिकेच्या सात शाळांना ‘आयएसओ’ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:04 AM2017-09-03T00:04:24+5:302017-09-03T00:05:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेच्या सात शाळांना ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. एकूण वीस शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्याबरोबरच गुणवत्ता वाढ, विविध शैक्षणिक उपक्रम या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. गेल्या वर्षभरात झालेल्या प्रशासकीय प्रयत्नांना यश मिळाले असून, वीसपैकी सात शाळा ‘आयएसओ’ मानांकनासाठी पात्र ठरल्या आहेत.
मानांकन मिळालेल्या शाळांमध्ये मनपा शाळा क्रमांक ७ (विश्रामबाग), शाळा क्रमांक २६ (कुपवाड), अहिल्यादेवी होळकर विद्यालय शाळा क्रमांक ४२ ( संजयनगर), उर्दू शाळा क्रमांक ४५ (नेहरूनगर, कुपवाड रोड, सांगली), जिजामाता शाळा क्रमांक ४ (शिवाजी चौक, मिरज), बिबी आपाजान नाईकवडी मुलींची उर्दू शाळा क्रमांक १६ (गुरुवार पेठ, मिरज) व कृष्णामाई प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक २० (कृष्णाघाट मिरज) या शाळांचा समावेश आहे. महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पालिकेच्या बंद पडत चालेल्या प्राथमिक शाळांना उर्जितावस्था आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी कृतिशील कार्यक्रम आखला होता.
या कार्यक्रमाअंतर्गत महापालिकेच्या ४० शाळा महापालिकेच्याच ४० अधिकाºयांना दत्तक देण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकाºयांनी या शाळांमध्ये लोकसहभात पायाभूत, भौतिक सुविधा निर्माण करण्याबरोबरच शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याचे ठरविले होते. खेबूडकर यांनी स्वत: शाळा क्रमांक ४२ दत्तक घेतली. त्यामुळे अन्य अधिकारीही कामाला लागले. शाळांचा पायाभूत व गुणात्मक दर्जा वाढविणे, स्वावलंबन कौशल्य, प्रश्न मंजुषा, विद्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चर, जास्तीत जास्त लोकसहभाग मिळवणाºया शाळेला लखपती पुरस्कार, बाल साहित्य संमेलन, शिष्यवृत्तीसाठी जादा तास असे उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे महापालिका शाळांचे रूपडे पालटले.
चालू शैक्षणिक वर्षात पालिकेच्या शाळांची पटसंख्याही वाढली आहे. आयुक्तांसह उपायुक्त सुनील पवार, स्मृती पाटील यांच्यासह शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांना अन्य अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनीही साथ दिली.
या शाळांमध्ये कायापालट
जिजामाता शाळा क्रमांक ४ उपायुक्त स्मृती पाटील यांनी दत्तक घेतली आहे. त्यांनी याठिकाणी संरक्षक भिंत बांधून बोलक्या भिंती उपक्रम राबविला. मुलांसाठी मतदान, रक्षाबंधन, बाल साहित्य मेळावा, पुस्तक प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन आदी उपक्रम राबवले. अल्लामा इकबाल उर्दू शाळा क्रमांक ४५ मध्ये स्मृती पाटील यांनी शाळेसमोर ड्रेनेजचे काम पूर्ण केले. मैदानाची दुरुस्ती, पाण्याची मोटार, खेळाचे साहित्य उपलब्ध केले. इंग्रजी शब्दाचे वाचन, कलर डे आदी उप्रकम राबवले. शाळा क्रमांक ७ मध्ये आरोग्य अधिकारी सुनील आंबोळे यांनी मैदान तयार करणे, झाडाचे रक्षाबंधन आदी उपक्रम राबवले. तर शाळा क्रमांक २० मध्ये विद्युत अभियंता अमरसिंह चव्हाण यांनी शाळेसाठी व्यायाम साहित्य, शाळेची दुरस्ती, संदर्भ ग्रंथालयाचा वापर, दैनंदिन वाढदिवस, गट पध्दतीने स्वच्छता, आॅनलाईन प्रोजेक्टरचा वापर, स्वयंम अध्ययन आदी उपक्रम राबवले. शाळा क्रमांक २६ मध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी झांजपथक निर्मिती, ढोलाच्या तालावर परिपाठ असे उप्रकम राबवले, तर शाळा क्रमांक १६ मध्ये कार्यकारी अभियंता शीतल उपाध्ये यांनी स्वतंत्र सभागृह उभारून संगणक लॅब उपलब्ध केली.
आयुक्तांची शाळाही मानांकनात
‘आयएसओ’ मानांकनप्राप्त अहिल्यादेवी होळकर शाळा क्रमांक ४२ आयुक्त खेबूडकर यांनी दत्तक घेतली आहे. त्यांनी या शाळेत लोकसहभागातून खेळाचे मैदान, संरक्षक भिंत बांधली. याशिवाय सांस्कृतिक सभागृह, बास्केटबॉल, मल्लखांब खेळाची सोय तसेच मुलांसाठी हॅण्डवॉशची सोयही केली. प्रश्नमंजुषा, परिपाठ लेखन, झांज व लेझीमचे खेळ, अंतर्गत स्वच्छतेसाठी गांडूळ खत प्रकल्प आदी उपक्रमक राबवले.