डफळे कारखान्यावर फुलणार इस्त्रायली डाळिंबे : ‘राजारामबापू’च्या व्यवस्थापनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 06:27 PM2018-08-22T18:27:34+5:302018-08-22T18:29:23+5:30

तिप्पेहळळी (ता. जत) येथील राजे विजयसिंह डफळे साखर कारखान्याच्या दहा एकर मोकळ्या जागेत इस्त्रायलच्या वाणाची डाळिंब लागवड करण्यात येणार आहे. इस्त्रायलच्या संशोधकांनी तेल्या रोग आटोक्यात आणण्याची औषधे विकसित केली असून, या

Israeli pomegranate blossomed on bum plant: Rajaram Bapu's decision to manage | डफळे कारखान्यावर फुलणार इस्त्रायली डाळिंबे : ‘राजारामबापू’च्या व्यवस्थापनाचा निर्णय

डफळे कारखान्यावर फुलणार इस्त्रायली डाळिंबे : ‘राजारामबापू’च्या व्यवस्थापनाचा निर्णय

Next
ठळक मुद्दे६०० ग्रॅम ते दीड किलोचे एक फळ; तेल्याला प्रतिकाराची क्षमता

अशोक डोंबाळे
सांगली : तिप्पेहळळी (ता. जत) येथील राजे विजयसिंह डफळे साखर कारखान्याच्या दहा एकर मोकळ्या जागेत इस्त्रायलच्या वाणाची डाळिंब लागवड करण्यात येणार आहे. इस्त्रायलच्या संशोधकांनी तेल्या रोग आटोक्यात आणण्याची औषधे विकसित केली असून, या वाणामुळे एकरी उत्पादनही दुपटी-तिपटीने मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एका डाळिंबाचे वजन ६०० ग्रॅम ते दीड किलोपर्यंत आहे.

जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील डाळिंब उत्पादक तेल्याच्या प्रादुर्भावाने हैराण झाला आहे. डाळिंब बाग लावण्यासाठी एकरी दोन-तीन लाखापर्यंत खर्च येतो. मात्र बाग तयार झाल्यानंतर दोन वर्षातच तेल्याचा फैलाव झाल्याचा अनुभव येत आहे. तेल्याचा फैलाव रोखण्यासाठी बाग काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. आता त्यांना इस्त्रायलच्या संशोधकांचा अनुभव आणि त्यांनी शोधून काढलेल्या औषधामुळे उत्पन्नाची आशा वाटू लागली आहे.

तिप्पेहळ्ळी येथील डफळे साखर कारखाना साखराळेच्या राजारामबापू साखर कारखान्याने चालवण्यास घेतला आहे. या युनिटमध्ये रिकामी जागा मुबलक आहे. काही अडचणींमुळे कारखान्याने गतवर्षीचा गळीत हंगाम घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर तेथील जागा विकसित करण्याचा निर्णय ‘राजारामबापू’च्या व्यवस्थापनाने घेतला. तेथे दहा एकर जागेत आधुनिक पध्दतीने डाळिंब लागवड करण्याचे निश्चित केले आहे.त्यानुसार इस्त्रायल येथील कंपनीशी चर्चा करण्यात आली आहे.

कंपनीच्या प्रतिनिधींनी मागील महिन्यात तिप्पेहळ्ळी येथील कारखान्याच्या मोकळ्या जागेची आणि तेथील वातावरणाची पाहणी केली आहे. त्यांनी डाळिंब लागवडीसाठी येथील वातावरण योग्य असल्याचे सांगितले आहे. आता या कंपनीकडून रोपे आणण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. इस्त्रायलमधून रोपांची आयात करण्यासाठीची कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. प्रत्येक रोप येथे पोहोचेपर्यंत ४०० ते ५०० रुपये खर्च येणार आहे. या कंपनीने १०२ आणि १०३ असे दोन डाळिंब वाण विकसित केले आहेत. इस्त्रायली डाळिंब लागवडीची पध्दतही वेगळी आहे. खोल खड्डा काढून लागण करण्याऐवजी गादी वाफे तयार करून रोपे लावली जाणार आहेत. रोपांच्या पुरवठ्याबरोबरच त्यांचे संगोपन कसे करायचे, कोणती औषधे वापरावीत, याचे मार्गदर्शनही संबंधित कंपनी करणार आहे.

तेल्या रोगाचा बंदोबस्त करणारी औषधे आपल्याकडे असल्याचा दावा कंपनीच्या प्रतिनिधींनी केला आहे. दहा एकरातील डाळिंब हंगाम पूर्ण करण्यासाठी, मार्गदर्शनासाठी कंपनीने ५० हजार डॉलर्स (३४ लाख ९० हजार ५०० रुपये) शुल्क मागितले आहे. त्यात सवलत मिळावी यासाठी चर्चा सुरू आहे. यावर आठवड्याभरात तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आले. डाळिंब शेतीतील वेगळा प्रयोग शेतकºयांसमोर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

इस्त्रायल कंपनीशी चर्चा
इस्त्रायलच्या कंपनीने तेथील डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही, असा दावा केला आहे. त्यातूनही रोग आलाच, तर तो आटोक्यात आणण्यासाठीची औषधेही असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले. त्यानुसार तिप्पेहळ्ळी येथील मोकळ्या जागेत इस्त्रायली डाळिंबबाग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. रोपे आणि कंपनीच्या मार्गदर्शनाचा खर्च जास्त आहे. तो कमी करण्यासाठी चर्चा सुरू आहे, असे राजारामबापू कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुभाष पाटील यांनी सांगितले.

Web Title: Israeli pomegranate blossomed on bum plant: Rajaram Bapu's decision to manage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.