कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासाठी एकच संयुक्त रिक्षा परवाना द्या, ऑटोरिक्षा संघटना महासंघाची मागणी
By संतोष भिसे | Published: November 24, 2022 01:50 PM2022-11-24T13:50:13+5:302022-11-24T13:50:44+5:30
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातून कामकाज चालायचे, त्यावेळी एकच संयुक्त परवाना होता
सांगली : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील रिक्षा चालकांना एकच संयुक्त परवाना देण्याची मागणी ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघाने केली आहे. यासंदर्भात कोल्हापुरात प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना निवेदन दिले.
महासंघाचे प्रदेशाध्यक्ष महेश चौगुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पाटील यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, यापूर्वी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातून कामकाज चालायचे, त्यावेळी एकच संयुक्त परवाना होता. या जिल्ह्यांचा परस्परसंपर्क मोठा असल्याने वाहतूकही चालते. मिरज, सांगली, कोल्हापुरात वैद्यकीय उपचारांसाठी शेकडो नागरीक प्रवास करतात. तीनही जिल्हे व्यापार, उद्योग, व्यावसायिकदृष्ट्या परस्परांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे प्रवासही मोठ्या प्रमाणात होतो.
महाविकास आघाडी सरकारने मागेल त्याला परवाना दिला, पण त्याचे कार्यक्षेत्र कमी करून दोन तालुक्यांवर आणून ठेवले. याचा प्रतिकूल परिणाम व्यवसायावर होत आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी ही मागणी राज्य परिवहन प्राधिकरण समितीच्या बैठकीत मांडण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देण्यासाठी मच्छिंद्र कांबळे, अशोक पाटील, राजेश रसाळ, रफिक खतीब, गोवर्धन गंगणे, रामचंद्र जाधव, सुभाष शेट्ये, राजीव जाधव यांच्यासह तीनही जिल्ह्यांतून रिक्षाचालक उपस्थित होते.