जत मतदारसंघात गाजणार पीक विमा, ‘म्हैसाळ’चा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:44 PM2019-09-24T23:44:41+5:302019-09-24T23:45:41+5:30
या वर्षाचा खरीप हंगामातील पीकविमा मिळालेला नाही. ‘म्हैसाळ’च्या पाण्याचा प्रश्नही पाच वर्षात गाजला असून, विधानसभा निवडणुकीत याच प्रश्नावर प्रचार रंगणार आहे.
गजानन पाटील ।
संख : राज्य शासनाने पिकांना व फळबागांना नुकसानभरपाई दिली. जत तालुक्यातील खरीप हंगामातील ५४ गावांना भरपाई मिळाली आहे. शासनाची दप्तरदिरंगाई व आचारसंहितेमुळे दुष्काळी रब्बी हंगामातील ६९ गावांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. या वर्षाचा खरीप हंगामातील पीकविमा मिळालेला नाही. ‘म्हैसाळ’च्या पाण्याचा प्रश्नही पाच वर्षात गाजला असून, विधानसभा निवडणुकीत याच प्रश्नावर प्रचार रंगणार आहे.
तालुक्यातील खरीप हंगामात ५४ गावे व रब्बी हंगामामध्ये ६९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यावर्षी तालुक्यात २६५.४४ मि.मी. पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने सुरुवातीला थोड्याप्रमाणात हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्या झाल्या. नंतर पाऊस न झाल्याने हाती काहीच लागले नाही. हंगाम पूर्णपणे वाया गेला. परतीच्या मान्सून पावसाने दडी दिल्याने रब्बी हंगाम वाया गेला आहे. डाळिंब, द्राक्षे या फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
राज्य सरकारने तालुका दुष्काळी म्हणून जाहीर केला. खरीप हंगामातील पिकासाठी नुकसान भरपाईची घोषणा केली. फळपिकासाठी हेक्टरी १८ हजार व इतर पिकासाठी हेक्टरी सहा हजार ८०० रुपये नुकसानभरपाई दिली आहे. सरकारने घोषणा केल्यानंतर खरीप गावांना नुकसानीचे वाटप केले. मात्र रब्बीचा हंगाम वाया जाऊनसुद्धा नुकसानभरपाई मिळाली नाही. प्रशासनाने महसूल आणि कृषी विभागाचा अहवाल मागवून घेतलेला नाही. हंगाम संपून तीन महिने झाले तरी, शासनाकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिने संपले तरीसुद्धा पावसाने दडी दिली आहे. खरीप हंगाम वाया गेला आहे.
रब्बी हंगामातील कुंभारी गाव वगळता बाकीच्या ६८ गावांना मे महिन्यात टँकर सुरू होते. सध्या ६३ टॅँकर व १३ चारा छावण्या सुरू आहेत. असे असतानाही रब्बी हंगामातील गावांना दुष्काळी नुकसानभरपाई मिळालेली नाही. जत पूर्व भागाला म्हैसाळ योजनेचे पाणी मिळाले नसल्यामुळे त्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक आहेत.
रब्बी हंगामातील अमृतवाडी, जत, देवनाळ, मेंढेगिरी, शेगाव, उमराणी, खोजनवाडी, कुडणूर, निगडी खुर्द, बागलवाडी, वळसंग, व्हसपेठ, कराजगी, मायथळ, घोलेश्वर, कुणीकोणूर, संख, खंडनाळ, गोंधळेवाडी, तिकोंडी, करेवाडी, पारधेवस्ती, कोणबगी, मोटेवाडी (को), अंकलगी, उमदी, कुलाळवाडी, कागनरी, आसंगी तुर्क, जालिहाळ खुर्द, सिध्दनाथ, कागनरी, मोटेवाडी (आसंगी), धुळकरवाडी, मोरबगी, जालिहाळ बुद्रुक, दरीबडची, लमाणतांडा (दरीबडची), करजगी, सुसलाद, बेळोंडगी, सोनलगी, माणिकनाळ अक्कळवाडी, बोर्गी खुुर्द, विठ्ठलवाडी, गुुुलगुंजनाळ, बालगाव, हळ्ळी, उटगी, निगडी (बुु), लमाणतांडा (उटगी), गिरगाव, लवंगा, रेवनाळ, काशिलिंगवाडी, कुंभारी, मुचंडी, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, पांढरेवाडी, शेड्याळ, रावळगुुंडवाडी, उंटवाडी, सोरडी, गुड्डापूर, दरीकोणूर, आसंगी ही गावे सवलतींपासून वंचित आहेत. सध्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीमध्ये शासनाकडून मिळालेल्या दुष्काळी सवलती व पीक विमा या मुद्द्यांची चर्चा रंगणार आहे.
मुख्यमंत्र्यांचे आश्वासनही पोकळच
तालुक्यातील सरपंचांच्या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांना रब्बी हंगामातील गावांना नुकसान भरपाईची मागणी केलेली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नुकसानभरपाई देण्याचे नियोजन केले आहे, असे सांगितले होते. परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
खरीप हंगामातील पीक विमा अधांतरी
बाजरी, मका, मूग, उडीद, तूर, भुईमूग या पिकांचा व डाळिंब फळबागेचा पीकविमा बजाज कंपनीकडे भरला आहे. खरीप हंगाम पावसाअभावी वाया गेला आहे. डाळिंब पीक पाणी नसल्याने व तेल्या रोगामुळे गेले आहे. परंतु पीक विमा मिळालेला नाही. हा मुद्दा निवडणुकीत चर्चेला जाणार आहे.
पाण्याअभावी रब्बी हंगाम वाया गेला आहे. पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. शासनाने रब्बी हंगामातील गावांना नुकसानभरपाई देणे गरजेचे होते.
- तुकाराम महाराज, संख