विश्रामबाग उड्डाणपुलाच्या नामकरणाचा मुद्दा पेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:21 AM2020-12-25T04:21:22+5:302020-12-25T04:21:22+5:30
सांगली : विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या नामकरणावरून महापालिकेत राजकीय धुरळा उडू लागला आहे. काँग्रेसच्या नगरसेविका रोहिणी पाटील यांनी ...
सांगली : विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या नामकरणावरून महापालिकेत राजकीय धुरळा उडू लागला आहे. काँग्रेसच्या नगरसेविका रोहिणी पाटील यांनी या पुलाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्याची मागणी महासभेत केली. महापौरांनी यावर हरकती व सूचना मागविण्यास मंजुरी दिली असली, तरी भाजपने मात्र सावध भूमिका घेतली आहे. विविध संघटना, समाजाने महापुरुषांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण न होता नामकरण करण्याची मागणी होत आहे.
विश्रामबागकडून लक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या रेल्वे फाटकामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. त्यामुळे तिथे उड्डाणपुलाची मागणी वर्षानुवर्षे होत होती. आमदार सुधीर गाडगीळ यांनी पाठपुरावा करून अखेर रेल्वे उड्डाणपुलाला मंजुरी आणली. दोन वर्षात पुलाचे कामही पूर्ण झाले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय टळली आहे.
या पुलाच्या नामकरणाचा मुद्दा आता तापू लागला आहे. महासभेत माधवनगर रस्त्यावरील एका चौकाला मदनभाऊ पाटील स्मारक चौक असे नामकरण करण्याचा विषय नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी दिला होता. या विषयाच्या अनुषंगाने रोहिणी पाटील यांनी रेल्वे उड्डाणपुलाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्याची मागणी महापौरांकडे केली. अचानक ही मागणी झाल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली. गटनेते युवराज बावडेकर यांनी सावध भूमिका घेत काही सामाजिक संघटना व समाजानेही मागणी असल्याचे सांगत महापौरांना त्यावर निर्णय देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर काँग्रेसचे संतोष पाटील यांनी सूचना व हरकती मागविण्यास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी केली. अखेर महापौरांनी त्याला सहमती दर्शविली. त्यामुळे आता उड्डाणपुलाच्या नामकरणाचा मुद्द्यावर वातावरण तापणार आहे.