मिरज शहरातील रस्त्यांचा प्रश्न महिन्याभरात निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:40 AM2020-12-16T04:40:44+5:302020-12-16T04:40:44+5:30

सांगली : मिरज शहरात अमृत पाणी योजनेमुळे अनेक रस्ते उखडले होते. या रस्त्यांची कामे आता हाती घेण्यात आली असून ...

The issue of roads in Miraj city was resolved within a month | मिरज शहरातील रस्त्यांचा प्रश्न महिन्याभरात निकाली

मिरज शहरातील रस्त्यांचा प्रश्न महिन्याभरात निकाली

Next

सांगली : मिरज शहरात अमृत पाणी योजनेमुळे अनेक रस्ते उखडले होते. या रस्त्यांची कामे आता हाती घेण्यात आली असून महिन्याभरात खराब रस्त्यांचा प्रश्न निकाली निघेल, असे स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे यांनी मंगळवारी सांगितले. महापालिकेकडून कायमस्वरूपी पॅचवर्कची यंत्रणाही उभारली जाणार असून त्यासाठी दीड कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा साडेतीन महिन्यांनंतर झाली. त्यानंतर कोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अमृत योजनेमुळे मिरज शहरातील अनेक रस्ते उकरण्यात आले होते. त्यामुळे दीड वर्ष नागरिकांची मोठी गैरसोय झाली. आता योजनेचे काम पूर्ण होत आले असून पाईपलाईनसाठी उकरलेल्या रस्त्यांची दुरुस्तीही हाती घेतली आहे. सध्या सहा कोटीची रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली होती. ही कामे सुरू झाली आहेत. याशिवाय नगरसेवकांचा स्थानिक निधी, जिल्हा नियोजन समितीतूनही रस्त्यांची कामे प्रस्तावित केली आहेत. या कामांच्या वर्कऑर्डर देण्यात आल्या असून येत्या महिन्याभरात खराब रस्त्यांचा प्रश्न निकाली निघेल.

महापालिका क्षेत्रात रस्त्यांवरील खड्डे मुजविण्यासाठी दरवर्षी निविदा काढली जाते. यंदा पॅचवर्कची कामे महापालिकेच्या यंत्रणेमार्फतच करण्याचा निर्णय घेतला आहे. पॅचवर्कसाठी मजूर व साहित्य पुरवठ्याच्या निविदांना मंजुरी दिली आहे. याशिवाय रोडरोलर व इतर यंत्रसामग्रीही खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे बाराही महिने खड्डे मुजविण्याचे काम सुरू राहील. त्यासाठी दीड कोटी खर्चासही स्थायी समितीत मंजुरी दिल्याचे कोरे यांनी सांगितले.

चौकट

पाणी पुरवठ्यावर अधिकारी धारेवर

नदीपात्रात मुबलक पाणी असूनही शहरात पाणीपुरवठ्याचा ठणठणाट आहे. पाईपलाईन खराब झाल्याने जागोजागी गळती होते. रबर ट्यूब गुंडाळून त्या काढण्याचा फार्स केला जातो, असा आरोप मंगेश चव्हाण यांच्यासह सदस्यांनी केला. यावर सभापती पांडुरंग कोरे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत, तात्काळ आराखडा करण्याचे आदेशही दिले.

Web Title: The issue of roads in Miraj city was resolved within a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.