औषधे, ऑक्सिजन वेळेवर न मिळाल्यास उपचार करणे कठीण : नितीन जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:26 AM2021-05-10T04:26:48+5:302021-05-10T04:26:48+5:30
शिराळा : कोरोनाच्या रुग्णांचे उपचार करतांना ऑक्सिजन, रेमडेसिविर, टोसिलीझुमाब, पीपीई आदी गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. सध्या रेमडेसिविरचा तुटवडा सर्वत्र ...
शिराळा : कोरोनाच्या रुग्णांचे उपचार करतांना ऑक्सिजन, रेमडेसिविर, टोसिलीझुमाब, पीपीई आदी गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. सध्या रेमडेसिविरचा तुटवडा सर्वत्र आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणे अवघड होत आहे असेच चालू राहिल्यास राज्यातील सर्व जिल्ह्यांतील, गावांतील रुग्णालयांना आणि डॉक्टरांना काम करणे अशक्य होणार आहे. सरकारने या वस्तुस्थितीवर त्वरित पावले उचलणे क्रमप्राप्त ठरेल, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन जाधव व शिराळा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रकाश पाटील यांनी केली आहे.
ते म्हणाले, ऑक्सिजनचे दर तिपटीपेक्षा जास्त झाले आहेत. रुग्णालयात रेमडेसिविर हे सरकारने अधिकाऱ्यांमार्फत द्यायची घोषणा केली आणि रुग्णांच्या नातेवाईकांना लिहून देण्यात येऊ नये, असेही सांगितले. पण प्रत्यक्षात रेमडेसिविरचा पुरवठाच होत नसेल तर रुग्णालय हे इंजेक्शन्स आणणार कुठून? त्यामुळे हा प्रश्न गंभीर बनला आहे. ऑक्सिजनच्या बाबतीत तेच घडत आहे. पुरवठादार ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर आणि आवश्यक तेवढा करत नाहीत असे असतांना रुग्णालय ऑक्सिजन कुठून? आणणार?
त्यामुळेच रेमडेसिविर किंवा ऑक्सिजन किंवा तत्सम अत्यावश्यक गोष्टी रुग्णालयांना वेळेवर आणि योग्य प्रमाणात पुरवल्या पाहिजेत. तुटवडा असल्याचा आणि पुरवठा नसल्याचा दोष रुग्णालयांवर न देता सत्य परिस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. या साथीच्या आजारात प्राण वाचविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी रात्रंदिवस काम करत आहेत. प्रशासनाकडून आवश्यक औषधे, ऑक्सिजनचा अखंड आणि सुनिश्चित पुरवठा गरजेचे आहे.
यावेळी डॉ. शैलेश माने, डॉ. विनायक महानवर, डॉ. राहुल कदम, डॉ. जयदीप नलवडे उपस्थित होते.