जतमध्ये विघ्नहर्त्याच्या विसर्जनाचेच मोठे विघ्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:08 AM2018-09-19T00:08:46+5:302018-09-19T00:08:50+5:30
गजानन पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : जत तालुक्यात पावसाने दडी दिल्याने ५२ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या २२ गावांनी प्रशासनाकडे टॅँकरची मागणी केली आहे. पाण्याअभावी विहिरी कोरड्या पडल्या आहेत. २८ पैकी ७ तलाव कोरडे असून, १४ तलावातील पाणीसाठा मृत संचयाखाली आहे. त्यामुळे यावर्षी गणेश मंडळांपुढे गणपतीचे विसर्जन कोठे करायचे, हा प्रश्न गावा-गावातून निर्माण झाला आहे.
तालुक्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या मोठी आहे. वाड्या-वस्तीवर गणेश मंडळे आहेत. अनेक मंडळांनी मोठ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. यावर्षी मंडळांची नोंदणी आॅनलाईन करण्यात आली आहे. आॅनलाईन सेवेला इंटरनेट सुविधा व्यवस्थित मिळत नसल्यामुळे नोंदणीकृत मंडळांची संख्या कमी आहे. जत पोलीस ठाण्याकडे ३२ व उमदी पोलीस ठाण्याकडे ६८ मंडळांची नोंदणी झाली आहे. प्रत्यक्षात गणेश मंडळांची संख्या जास्त आहे. अनेक मंडळे नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत.
नारळी पौर्णिमेनंतर तालुक्यात परतीच्या पावसाचा प्र्रवास सुरू होईल, असे वाटत होते. पण अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. विहिरी, ओढे, नाले, बंधारे कोरडे पडले आहेत. नळ पाणी पुरवठा योजनांच्या विंधन विहिरी, परिसरातील पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. उन्हाच्या तीव्रतेने पाण्याची पातळी ४०० ते ५०० फुटापर्यंत खाली गेली आहे. तालुक्यातील ५२ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
ऐन पावसाळ्यातही अंकलगी, दरीबडची, कोंत्येवबोबलाद, व्हसपेठ, सोन्याळ, बागलवाडी, माडग्याळ, माणिकनाळ, तिकोंडी, हळ्ळी, कोणबगी, काराजनगी, सोनलगी, सोरडी, अंतराळ, आसंगी (जत), तिल्याळ, पांढरेवाडी, लमाणतांडा (दरीबडची), शिंगणापूर, सनमडी, वज्रवाड, बसरगी, टोणेवाडी, मिरवाड, बेळुंखी, बाज, कुडणूर, जिरग्याळ, लकडेवाडी या गावांनी टॅँकरची मागणी केली आहे. यामधील बागलवाडी, माडग्याळ, माणिकनाळ, तिकोंडी, शिंगणापूर व कोणबगी या सहा गावात प्रशासनाने टॅँकर सुरू न करता पर्यायी पाण्याचे स्रोत उपलब्ध करून दिले आहेत.
आडात नाही : पोहऱ्यात कोठून
पावसाअभावी तलाव, कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गणेश मंडळांची संख्या अधिक आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती आकाराने मोठ्या आहेत. त्यांचे विसर्जन करण्यासाठी जास्त खोलीच्या पाण्याची गरज आहे. जास्त पाणी नसल्याने मूर्ती विसर्जनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. मूर्ती व निर्माल्यामुळे पाणी दूषित होत असल्याने, विहिरीत गणेश विसर्जन करायला शेतकरी सहमती देत नाहीत.
पाऊसही रुसला...
तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ४५७.७ मि.मी. असून, आजअखेर १६४.१४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सोरडी, सिद्धनाथ, तिकोंडी - १, तिकोंडी - २, पांडोझरी, बेळुंखी, खोजानवाडी अशा सात तलावातील पाणीसाठा संपला आहे. संख माध्यम प्रकल्प, दोेड्डनाला मध्यम प्रकल्प व दरीबडची, गुगवाड, मिरवाड, डफळापूर, बिळूर, केसराळ, उमराणी, भिवर्गी, शेगाव क्र. २ या तलावातील पाणीसाठा मृत संचयाखाली आहे.