सांगली बाजार समितीत आता रविवारीही बेदाण्याचे सौदे, १७५ प्रतिकिलो भाव
By संतोष भिसे | Published: March 12, 2023 05:56 PM2023-03-12T17:56:49+5:302023-03-12T17:57:05+5:30
सांगली बाजार समितीतील सौद्यांसाठी बेदाण्याची आवक वाढल्याने रविवारी देखील सौदे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सांगली: बाजार समितीतील सौद्यांसाठी बेदाण्याची आवक वाढल्याने रविवारीदेखील सौदे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज (दि. १२) झालेल्या रविवारच्या पहिल्याच सौद्यासाठी १४० टन बेदाण्याची आवक झाली. खरेदीसाठी देशभरातून व्यापारी उपस्थित होते.
सचिव महेश चव्हाण यांनी सांगितले की, सौद्यामध्ये सांगली, तासगाव, मिरज, जत, विजापूर, पंढरपूर, अथणी परिसरातील शेतकऱ्यांच्या बेदाण्याला चांगला दर मिळत आहे. मार्चच्या सुरुवातीलाच तब्बल २०० गाडी बेदाण्याची विक्रमी आवक झाली. गेल्या २० वर्षांतील हा विक्रम आहे. आवक वाढल्याने रविवारीही सौदे सुरु केले आहेत. पहिल्या सौद्यामध्ये उत्तम दर्जाच्या मालास १७५ रुपये प्रति किलो असा भाव मिळाला. सौद्यानंतर शेतकऱ्यांना पट्टी व पैसे लवकरात लवकर दिले जातात.
सौद्यासाठी मनोज मालू, प्रशांत मजलेकर, रितेश मजेठिया, सुनील हडदरे, सतीश पटेल, प्रणव सारडा, तुषार शहा, अनिल पटेल, विनोद गिडे, रुपेश पारेख, ऋषभ शेडबाळे, मनीष मालू, राजू अरोरा, देवेंद्र करे आदी उपस्थित होते. समितीत बुधवारी व शुक्रवारीही सौद्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चव्हाण म्हणाले.