शरद पवारांनी एका रात्रीत सूत्रे फिरविली, मणिपूरमधील दंगलीतून जतच्या विद्यार्थ्यांची सुटका झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 12:54 PM2023-05-06T12:54:08+5:302023-05-06T13:02:32+5:30
मध्यरात्रीच या विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य दलाने सुरक्षितस्थळी हलविले
जत : मणिपूर येथील दंगलीत सापडलेल्या जत तालुक्यातील व राज्यातील काही विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एका रात्रीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूत्रे फिरविली. शरद पवार यांच्या तत्परतेमुळे गुरुवारी मध्यरात्रीच या विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य दलाने सुरक्षितस्थळी हलविले. त्यामुळे त्यांची दंगलीतून सुटका झाली.
मळद (ता. बारामती) येथील प्रल्हाद वरे यांना गुरुवारी सायंकाळी ७ वाजता आवंढी (ता. जत) येथील संभाजी कोडग यांचा फोन आला. त्यांनी त्यांचा मुलगा आयआयआयटी इन्फाळ येथे शिक्षणासाठी आहे. तो त्याच्या बारा मित्रांसह वसतिगृहात राहतो. या वसतिगृह परिसरात ठिकठिकाणी दंगल सुरू आहे. या भयंकर परिस्थितीत काहीही करा; परंतु माझ्या मुलाला व त्याच्या मित्रांना वाचविण्यासाठी प्रयत्न करा, अशी विनवणी केली.
वरे यांनी शुक्रवारी सकाळी शरद पवार यांच्याकडे जाऊ, असे सांगत मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला; परंतु कोडग यांनी, एवढा पण वेळ नाही कधीही वसतिगृहावर हल्ला होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली. नंतर वरे यांनी कोडग यांना शरद पवार यांचे स्वीय सहायक राऊत यांचा मोबाइल क्रमांक दिला. कोडग यांनी तातडीने राऊत यांच्याशी संपर्क साधत माहिती दिली. तेव्हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मणिपूरच्या राज्यपालांना फोन करून संबंधित मुलांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी सांगितले.
त्यानंतर रात्री १२ वाजता भारतीय सैन्य दलाच्या चीफ कमांडरांनी कोडग यांचा मुलगा मयूर कोडग याच्याशी संपर्क साधला. त्यानुसार त्यांनी सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवले.