शरद पवार यांनी राजकारणाबाबत दिला महत्वाचा सल्ला, म्हणाले..
By हणमंत पाटील | Published: July 9, 2024 12:10 PM2024-07-09T12:10:17+5:302024-07-09T12:16:30+5:30
शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक शेती करावी
कवठे एकंद : शेतीला पाणी गरजेचे आहे. पण अति होऊनही चालणार नाही. जमिनीचे आरोग्य बिघडते. त्यासाठी अतिरिक्त होणारे पाणी बाहेर काढले पाहिजे. शासन आणि शेतकरी यांनी समन्वयाने क्षारपड निर्मूलनाचा प्रश्न निकाली काढावा. शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक शेती करावी, असा सल्ला देत अगोदर प्रपंच नीट चालवून राजकारण करणे शहाणपणाचे आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कवठे एकंद येथे व्यक्त केले.
कवठे एकंद (ता. तासगाव) येथील सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा संस्थेच्या वतीने आयोजित ‘क्षारपड व पाणथळ जमीन सुधारणा’ मोहिमेविषयी पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार सुमनताई पाटील, नरेंद्र खाडे, युवानेते रोहित पाटील, पाटबंधारे संशोधन विभाग पुणेच्या कार्यकारी अभियंता प्रिया लांझेकर, संजय बजाज आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, ' ऊस शेती ही आळशी लोकांची आहे. एकदा ऊस लावला की साखर कारखान्याला पाठवायची वाट बघायची. बाकीचा सगळा वेळ दुनियाभरच्या राजकारणाच्या चर्चा करत बसायचं. हे योग्य नाही. त्याऐवजी प्रपंच नेटाने केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
यावेळी कार्यकारी अभियंता प्रिया लांझेकर म्हणाल्या, “ क्षारपड सुधारण्यासाठी ८० टक्के शासन निधी तर १० टक्के संबंधित शेतकरी तसेच १० टक्के परिसरातील साखर कारखाना उद्योग असे प्रयोजन शासनाचे आहे.” रोहित पाटील, रामचंद्र थोरात, प्रा. बाबूराव लगारे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रवीण वठारे यांनी सूत्रसंचालन केले. रामचंद्र थोरात यांनी प्रस्ताविक केले. सूर्यकांत पाटील यांनी आभार मानले.
क्षारपड जमीन निर्मूलनासाठी साकडे..
कवठे एकंद येथील क्षारपड जमीन निर्मूलनासाठी शासकीय योजनेतून लाभ द्यावा, अशा मागणीचे निवेदन सिद्धराज पाणीपुरवठा संस्थेच्या सभासदांच्या वतीने शरद पवार व सुमनताई पाटील यांना देण्यात आले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर, आशुतोष धर्मे, समीर घबाडे, तानाजी मदने, शिराज मुजावर, उपाध्यक्ष राजाराम माळी, अशोक घाईल, सर्जेराव पाटील, अनिल पाटील, दीपक घोरपडे बाळासो शिरोटे, प्रकाश देसाई, सुनील लंगडे, विद्यासागर लंगडे, राजेंद्र माळी आदी मान्यवर उपस्थित होते.