म्युकरमायकोसिस रुग्णांची नियमित माहिती देणे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:28 AM2021-05-26T04:28:20+5:302021-05-26T04:28:20+5:30
सांगली : जिल्ह्यात सध्या म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या रुग्णांवर उपचारासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. सध्या रुग्णालयात ...
सांगली : जिल्ह्यात सध्या म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या रुग्णांवर उपचारासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १०५ झाली असून, रुग्णालयांनी याबाबतची सर्व माहिती प्रशासनाला द्यावी. जेणेकरून रुग्णांना वेळेत इंजेक्शनचा पुरवठा होण्यासह मदत होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात म्युकरमायकोसिसवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची बैठक घेण्यात आली. यात जिल्हाधिकाऱ्यांनी उपचार व नियोजनाबाबत सूचना दिल्या.
म्युकरमायकोसिस बाधा झालेल्या रुग्णांना वापरण्यात येणारे ‘ॲम्पोथेरीसीन बी’ हे औषध शासनाकडून उपलब्ध होत आहे. ते सध्या रुग्णांच्या नातेवाईकांकडे देण्यात येते. त्याऐवजी हे औषध यापुढे या आजारावर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णालयात देण्याचा निर्णय या बैठकीत झाला.
सर्व डेडिकेटेड कोविड सेंटर, डेडिकेटेड कोविड रुग्णालयात म्युकरमायकोसिस सुरुवातीच्या काळातच प्रतिबंधित कसा करावा, याबाबत वेबिनारव्दारे प्रशिक्षण द्यावे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे म्युकरमायकोसिससंबंधी शस्त्रक्रिया करावी लागल्यास त्यासाठीची तयारी करून ठेवावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, आयएमए अध्यक्ष डॉ. माधवी पटवर्धन, डॉ. ए. पी. चढ्ढा उपस्थित हाेते.