जुनी गाडी रंगवून रुग्णवाहिका म्हणून देणे हे तालुक्याचे दुर्दैव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:19 AM2021-06-05T04:19:54+5:302021-06-05T04:19:54+5:30
माडग्याळ : जुन्या गाडीला रंग देऊन रुग्णवाहिका म्हणून देणे हे जत तालुक्याचे दुर्दैव असल्याचे मत ॲड. म्हाळप्पा पुजारी ...
माडग्याळ
: जुन्या गाडीला रंग देऊन रुग्णवाहिका म्हणून देणे हे जत तालुक्याचे दुर्दैव असल्याचे मत ॲड. म्हाळप्पा पुजारी यांनी व्यक्त केले.
पुजारी म्हणाले की, वळसंगचे उद्योजक तथा भाजपचे नेते सतीश चव्हाण यांनी जत ग्रामीण रुग्णालयाला रुग्णवाहिका भेट दिली. त्या गाडीची नोंदणी पाच वर्षांपूर्वीची आहे. जुन्या गाडीला रंग देऊन वळसंग गावात गाजावाजा करून गावभर मिरवणूक काढून रुग्णवाहिका देण्याचा फार्स सतीश चव्हाण यांनी केला आहे. ही तालुक्यातील जनतेच्या डाेळ्यात धूळफेक आहे. चव्हाण यांनी वळसंग ग्रामपंचायतीची सत्ता दहा वर्षे भोगली आहे. वळसंग गावातील लोकांना त्यांनी कसे फसवले आहे, हे सर्वांना माहीत आहे. केवळ प्रसिध्दीच्या झोतात येण्यासाठी आता पुन्हा फसविण्यास निघाले आहेत.
चव्हाण यांनी सत्ता असताना ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत पाडून टाकली. दहा वर्षांत तेथे पायाभरणीही केली नाही. गावात एकही रस्ता चांगला केला नाही. नवीन वसाहतीत विकासकामे केले नाहीत. सध्या या ग्रामपंचायतीचे कामकाज अंगणवाडीच्या इमारतीतून करावे लागत आहे. आता प्रसिद्धी मिळविण्यासाठी जुनी गाडी रुग्णवाहिका म्हणून रुग्णालयाला देण्याचा फार्स चव्हाण यांनी केला आहे. रुग्णवाहिका नवीन का दिली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.