साखर कारखानदारीत ५१ वर्षे संचालक, २५ वर्षे अध्यक्षपद सांभाळणे सोपे नव्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:27 AM2021-01-23T04:27:55+5:302021-01-23T04:27:55+5:30
इस्लामपूर : सहकारी साखर कारखानदारीत ५१ वर्षे संचालक आणि २५ वर्षे अध्यक्षपद सांभाळणे ही सोपी गोष्ट नाही. राजारामबापू कारखान्याचे ...
इस्लामपूर : सहकारी साखर कारखानदारीत ५१ वर्षे संचालक आणि २५ वर्षे अध्यक्षपद सांभाळणे ही सोपी गोष्ट नाही. राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी.आर. पाटील यांनी ते करत कारखाना चांगला चालवला आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी काढले. याचवेळी त्यांनी राज्य साखर संघाच्या नियोजित अध्यक्षपदी पाटील यांची निवड केल्याची घोषणाही केली.
कुरळप (ता. वाळवा) येथे पी.आर. पाटील यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार कार्यक्रमात खा. पवार बोलत होते. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, स्वागताध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खा. धैर्यशील माने, आ. मानसिंगराव नाईक, आ. सुमनताई पाटील, आ. शेखर निकम, आ. अरुण लाड, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार चंद्रदीप नरके, पुरुषोत्तम जगताप, अमर पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खा. शरद पवार आणि आ. सुमनताई पाटील यांच्या हस्ते पी.आर. पाटील व रत्नकांता पाटील यांचा सत्कार करण्यात आला. ‘पांडुरंगाची अमृतगाथा’ या गौरव अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
खा. पवार म्हणाले, राजारामबापू पाटील नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणारे नेते होते. त्यांच्याबरोबर पी.आर. पाटील यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली. साखर कारखानदारीत ५१ वर्षे संचालक आणि २५ वर्षे अध्यक्षपद सांभाळणे, ही सोपी गोष्ट नाही. साखर कारखाना उत्तम चालविताना जयंतरावांकडून कशाचीही अपेक्षा न करता भरताची भूमिका घेणारा पी.आर. पाटील यांच्यासारखा सहकारी मिळाला. त्यांचा सन्मान करताना आनंद होत आहे.
जयंत पाटील म्हणाले, बापूंनी निर्माण केलेल्या नि:स्पृह कार्यकर्त्यांचा ठेवा मला मिळाला आहे. त्यातीलच एक पी.आर. दादा आहेत. बापूंच्या सहकाऱ्यांनीच मला बेरजेचे राजकारण शिकविले. भविष्यात नव्या पिढीला सहकारी संस्थांमध्ये संधी देणार आहोत.
पी.आर. पाटील म्हणाले, सार्वजनिक आणि राजकीय जीवनात मूल्ये जपून काम करत आलो.
प्रा. शामराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास राज्य बॅँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, युवा नेते प्रतीक पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, माजी आमदार बाबासाहेब पाटील, सत्यजित देशमुख, महेंद्र लाड, सुरेश पाटील, संजय बजाज, पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंगराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षितकुमार गेडाम, शहाजी काकडे उपस्थित होते.
फोटो - २२०१२०२१-आयएसएलएम- पी.आर. पाटील सत्कार न्यूज : कुरळप (ता. वाळवा) येथे पी.आर. पाटील व रत्नकांता पाटील यांचा सत्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार आणि आ. सुमनताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ. विश्वजित कदम, खा. धैर्यशील माने उपस्थित होते.