महिलांच्या पाठबळामुळेच कर्तृत्ववान पुरुषांची जडणघडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:29 AM2021-03-09T04:29:46+5:302021-03-09T04:29:46+5:30
सांगली : प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषांच्या पाठीमागे त्यांची पत्नी, आई आणि बहीण खंबीरपणे उभारल्यामुळेच अनेक कर्तृत्ववान पुरुष घडले आहेत, असे ...
सांगली : प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषांच्या पाठीमागे त्यांची पत्नी, आई आणि बहीण खंबीरपणे उभारल्यामुळेच अनेक कर्तृत्ववान पुरुष घडले आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केले.
महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेत आदर्श महिला खेळाडू, एक अथवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या दहा पालकांचा ‘माझी भाग्यश्री’ योजनेतून ठेव पावत्या देऊन गौरव केला. यावेळी अध्यक्षा कोरे बोलत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, सभापती आशा पाटील, सुनीता पवार, प्रमोद शेंडगे, जगन्नाथ माळी, सदस्य सरदार पाटील, विद्या शिवाजी डोंगरे, राजश्री एटम, आदी उपस्थित होते. यावेळी सेविका वर्षा भोसले यांचा नवोपक्रम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाबद्दल गौरव करण्यात आला. आदर्श महिला खेळाडू स्वाती पाटील, अंकिता मोहिते यांचाही गौरव करण्यात आला. डॉ. दादासाहेब खोगरे यांनी चाईल्ड १०९८ हेल्पलाईनबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषद महिला व बालकल्याणच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांनी प्रास्ताविक केले. अधीक्षक सुधीर मोरे यांनी आभार मानले.
चौकट -
कोरोनात आशा, अंगणवाडी सेविकांची कामगिरी आदर्श : जितेंद्र डुडी
कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आशा, अंगणवाडी, आरोग्य सेविकांनी उत्तम कामगिरी केली. यामुळेच ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे संकट कमी होण्यास मदत झाली आहे. यापुढेही अंगणवाडी सेविका, आशा, मदतनीस आणि आरोग्य सेविकांनी असेच सहकार्य करावे. जिल्हा परिषद प्रशासन सोबत असेल, असे आश्वासन जितेंद्र डुडी यांनी दिले.